Dombivli Crime : पती-पत्नीचे भांडण सोडवण्यास गेलेल्या दोघांची हत्या, दोन वेगवेगळ्या घटनांनी डोंबिवली हादरली
Dombivli Crime : एका प्रकरणात शेजाऱ्याची हत्या करण्यात आली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात भावजयीने दिराची हत्या केल्याचं समोर आलं.
ठाणे : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पती-पत्नीच्या वादात मध्यस्ती करायला गेलेल्या दोन व्यक्तींची हत्या झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये (Dombivli Crime) घडली आहे. एका प्रकरणात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात भावजयीने दिराची हत्या करून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका घटनेत पती-पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी राहणारा व्यक्ती मध्यस्थी करण्यास गेला. त्यानंतर त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे भाऊजयी आणि भावाचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दिराची भाऊजयीने हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर भाऊजयीने हाताची नस कापून घेतली आहे.
पती-पत्नीच्या वादात दिराची हत्या
डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्याची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. रविवारी दुपारीदेखील या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी घरात संदीप यांचा भाऊ सागर होता .
सागरने हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने भोसकले. या हल्ल्यात सागर जखमी झाला होता, नंतर त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दरम्यान संगीतानेदेखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. संगीतावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संगीताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-पत्नीचा वाद सोडवायला गेलेल्या शेजाऱ्याची हत्या
दुसऱ्या प्रकरणात उसरघर येथील एका बांधकामाच्या साईटवर ताहियाद अली, सुफीया अली हे दोघे पती-पत्नी मजुरी करतात. या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि सोफिया या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली हा वाद सोडवण्यासाठी आला.
संतापलेल्या ताहियादने जोहर ला लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ताहियात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान पती-पत्नीच्या वादातून घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा: