Delhi Crime News : ''होय, मीच साक्षीला ठार मारलं'', 16 वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या आरोपीची कबुली; दिल्लीतील धक्कादायक घटना
Delhi Stabbing Case : दिल्लीतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Delhi Murder Case : दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने निर्घृणपणे हत्या केली. आता पोलिसांना आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली होती, त्यानंतर चौकशीमध्ये त्यांनं साक्षीची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. दिल्लीतील शाहबाद परिसरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने चाकूनं सपासप वार करून हत्या केली. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली अन् सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पोलिसांना 29 मे रोजी साहिलला अटक करत त्याची चौकशी केली.
''मीच साक्षीची हत्या केली''
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशीत आरोपी साहिलला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आली. त्यावेळी त्यानं मान्य केलं की, ''व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती मीच आहे. मीच साक्षीची हत्या केली.'' मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी साहिल आणि साक्षी यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि यानंतर साहिलनं साक्षीचा खून केला. साक्षी आणि साहिल एकमेकांनागेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावर फॉलो करत होते.
16 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात आरोपी साहिलनं साक्षीला भररस्त्यात गाठून तिच्यावर चाकूनं सपासप वार करण्यास सुरुवात केली. 16 वर्षीय साक्षीला साहिलनं 21 वेळा चाकूनं भोसकलं. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साक्षीच्या डोक्यावर शेजारीच असलेल्या दगडानंही निर्घृणपणे हल्ला केला. आरोपी साहिलनं साक्षीचं डोकं दगडानं ठेचलं माणुसकीला काळीमा फासणारी बाब म्हणजे ही घटना भररस्त्यात घडली. यावेळ रस्त्यावर माणसांची रहादारी होती. मात्र, कुणीही साक्षीच्या मदतीला धावलं नाही. कुणीही साहिलला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
आरोपीला गुन्ह्याचा पश्चाताप नाही
दिल्ली पोलिसानी आरोपी साहिलला अटक करत 29 मे रोजी त्यांनी चौकशी केली. आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथून अटक केली. साहिलला दिल्लीतील बवाना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं चौकशीदरम्यान गुन्ह्याबद्दल त्यानं कोणताही पश्चात्ताप झालेला नाही.
'आरोपीला कठोर शिक्षा द्या', साक्षीच्या आईवडिलांची मागणी
मृत साक्षीच्या आईने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत दोषीला फाशी द्यावी असं म्हटलं आहे. तिच्या वडिलांनीही साक्षीच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे असं म्हटलं आहे. "माझ्या मुलीवर अनेक वेळा वार करण्यात आले, तिच्या डोक्याचेही तुकडे करण्यात आले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे," अशी प्रतिक्रिया साक्षीच्या वडिलांनी दिली आहे.