Delhi Crime News : 'त्या' नराधमाला पत्नीची साथ...पीडितेला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या; दिल्लीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी गौप्यस्फोट
Delhi Burari Minor Girl Case : दिल्लीतील बुरारी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी चौकशीत अनेक गोष्टी समोर येत आहेत.
दिल्ली : दिल्ली सरकारमध्ये अधिकारी असलेल्या प्रेमोदय खाखा याने आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर त्याच्या राहत्या घरी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
दिल्लीत खळबळ उडवणाऱ्या घटनेप्रकरणी 'टाइम्स नाऊ'च्या वृत्तसंकेतस्थळाने पोलिस अधिकार्यांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत पीडित अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. बुरारी भागातील शक्ती एन्क्लेव्हमधील रहिवासी प्रेमोदय खाखा आणि त्यांची पत्नी सीमा राणी अशी आरोपींची नावे आहेत. सीमा ही गृहिणी आहे. 13 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे पोलिस उपायुक्त (उत्तर) सागर सिंग कलसी यांनी सांगितले.
ऑक्टोबर 2020 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर, मुलीच्या आईने तिला आरोपींकडे पाठवले होते. आरोपी आणि पीडित मुलीच्या कुटुंबाचे कौटुंबिक मित्रत्वाचे संबंध होते. 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणीने प्रेमोदय खाखाला 'मामा' असे संबोधत होते. मात्र, खाखाने माणुसकीला काळीमा फासत राहत्या घरी अनेक वेळा मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर झाल्यानंतर आरोपी सीमा राणीने पीडितेला गर्भ पाडण्यासाठी प्रयत्न केले असल्याची माहिती चौकशीतून समोर आली.
अशी फुटली अत्याचाराला वाचा...
वारंवार होणाऱ्या अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलगी ही गरोदर राहिली होती. त्यावेळी खाखाच्या पत्नीने पीडितेला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये ही पीडित मुलगी आपल्या आईकडे पुन्हा घरी गेली.
ऑगस्ट महिन्यात या पीडितेला एंग्जायटी अटॅक (Anxiety Attack) आला. त्यामुळे तिच्या आईने उपचारासाठी मुलीला रुग्णालयात दाखल केले. समुपदेशन सत्रादरम्यान पीडितेने डॉक्टरांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
प्रेमोदय खाखा दिल्ली सरकार महिला आणि बाल विकास (डब्ल्यूसीडी) विभागातील अधिकारी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला सरकारने सेवेतून निलंबित केले. आरोपी प्रेमोदय खाखा विरोधात 13 ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, जवळपास एक आठवडा दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर पोलिसांनी खाखा आणि त्याच्या पत्नीला अटक केली.
महिला आयोगाच्या अध्यक्षांना परवानगी नाकारली
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना रुग्णालय प्रशासनानं बलात्कार पीडितेला भेटण्यास नकार दिला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयाबाहेरच ठिय्या दिला. त्या रात्रभर रुग्णालयाबाहेरच बसून होत्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल 21 ऑगस्ट रोजी पीडितेला रुग्णालयात भेटण्यासाठी आल्या होत्या, परंतु रुग्णालय प्रशासनानं त्यांना पीडितेला भेटू दिलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी कोणालाही भेटू न देण्याची सूचना केली असल्याचे रुग्णालयाने म्हटले होते.