Dadar Crime : सायलेंट किलरची व्हायलंट मर्डर मिस्ट्री, मूकबधिर गँगने केली मूकबधिराची हत्या, हत्याकांडाचे धागेदोरे दुबईपर्यंत
Dadar Suitcase Dead Body : ही हत्या करताना एक व्हिडीओ काढण्यात आला असून त्यामध्ये एक तरूणीही दिसतेय. आता ती तरूणी कोण आहे याचा तपास पोलिस घेत आहेत.
मुंबई : आजपर्यंत अनेक हत्याकांडांबद्दल ऐकलं असेल, पण मुंबईत एक असं हत्याकांड घडलंय ज्याचं वर्णन फक्त सायलंट किलरची व्हायलंट मिस्ट्री असं करता येईल. कारण मूकबधिर गँगने एका मूकबधिर व्यक्तीचीच निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या हत्याकांडाचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचल्याचं बोललं जातंय.
घटना आहे दादरची. प्लॅटफॉर्मवरून भली मोठी सुटकेस ओढत घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीचा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी सखोल चौकशी केली. त्यातून बाहेर आलेली माहिती धक्कादायक होती. सांताक्रुझ येथे राहणाऱ्या मूकबधिर अर्शद शेखला आरोपींनी नग्न करून, जबर मारहाण करत त्याची निर्घृण हत्या केली.
हत्या करणारेही मुकबधीर
धक्कादायक म्हणजे, मूकबधिर अर्शदची हत्या करणारे आरोपीही मूकबधिरच आहेत. त्यांनी हत्या करतानाचा व्हिडीओही बनवल्याचं उघड झालंय. हत्या केल्यानंतर आपलं बिंग फुटू नये म्हणून, अर्शदचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी नेला जात होता. पण दादर स्टेशनवर पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं.
मयत अर्शद अली सादीक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु प्यायला बसले असताना शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादीक शेखचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखचा खून केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्याप्रकरणाचा घटनाक्रम समोर आला आहे.
व्हिडीओतील तरूणी कोण?
पण आता पोलिसांना एका प्रश्नाचं गूढ अद्याप समजलेलं नाही. ज्याचा छडा लावण्याचा पोलिस कसोशीनं प्रयत्न करतायत तो प्रश्न म्हणजे, मारहाणीच्या व्हिडीओत दिसणारी ती तरुणी कोण? आणि या हत्येचं कारण काय?
अर्शदचे हात बांधून त्याला मारताना शिवजीतने एका तरुणीसह दोघांना व्हिडीओ कॉल केला होता. शिवजीतने अर्शदला नग्न करुन त्याला मारहाण केली. त्यावेळी अर्शद जीव वाचवण्यासाठी गयावया करत होता. व्हिडीओ कॉलमधील व्यक्त्ती तिसऱ्या मूकबधिर व्यक्तीला व्हिडीओ कॉल करून मारहाणीचे लाइव्ह चित्रण दाखवत होते. ती तरुणीदेखील अर्शदला आणखी मारण्यासाठी प्रोत्साहित करत होती. यातील व्हिडीओ कॉलमधील व्यक्ती मास्टरमाइंड असून ती दुबईत असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. हे व्हिडीओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे.
हत्याकांडाचे धागेदोरे दुबईपर्यंत
आता अर्शद शेखचा भाऊ अशरफने दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडाचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचलेत. व्हिडीओत दिसणारे आरोपी हे मूकबधिर आरोपी कोण आहेत त्यांची चौकशी करण्याची मागणी अशरफने केली आहे.
दरम्यान, या हत्याकांडातील प्रवीण चावडा आणि शिवजीत सिंह या दोन आरोपींना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, मूकबधिर गँगने मूकबधिर अर्शद शेखला का मारलं? आणि या हत्याकांडाचा मास्टरमाईंड नेमका कोण? या प्रश्नांचा पाठलाग आता पोलिसांना करायचा आहे.
ही बातमी वाचा: