Crime News : मुलींसोबत मैत्री करण्यासाठी करायचा बाईक चोरी; हार विक्रेत्याला पोलिसांच्या बेड्या
Crime News : बाईक चोरी प्रकरणी कल्याण पोलिसांनी एका फूल विक्रेत्याला अटक केली आहे. मुलींसोबत मैत्री करण्यासाठी आरोपी महागड्या बाईक चोरी करत असे.
Crime News : महागड्या बाईकचा वापर करून मुलींना आकर्षित करणे आणि त्यानंतर हा बाईक विकून हौस मौज करण्याच्या नादात एका तरुणाला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी एका बाईक चोराला अटक केली. माधव भामरे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून पोलिसांनाी तीन बाईक जप्त केल्या आहेत. त्याशिवाय हा आरोपी बाईक चोरीच्या आणखी काही प्रकरणात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात बाईक चोरीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. बाईक चोरीच्या घटनांचा तपास करताना कल्याण पोलिसांना एक तरुण चोरीची दुचाकी विकण्यासाठी टिटवाळा गोवेली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत माधव भामरे याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केलेल्या आणखी तीन बाईक जप्त केल्यात. आरोपी माधव विरोधात कल्याणसह ठाणे, मु्ंबईतही बाईक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील खडवली गावात राहणाऱ्या माधव भामरे हा टिटवाळा गणेश मंदिर परिसरात हार फुले विक्री करत उदरनिर्वाह करत होता. त्याला मुलींशी बोलण्याची सवय होती. मुलींना आकर्षित करण्यासाठी महागड्या बाईकची कल्पना त्याला सुचली. मात्र तितके पैसे नसल्याने त्याने बाईक चोरी करणे सुरू केले. इतकेच नव्हे तर मुलींना बाईकवर फिरवल्यानंतर तो या बाईक विकून हौस मौज करत असे. माधवने आणखी काही बाईक चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: