नांदेडमधील बियाणी हत्याप्रकरणाचं गूढ उलगडलं, सात जण पोलिसांच्या ताब्यात
Nanded Crime News : नांदेडमधील बियाणी हत्याप्रकरणाचं गूढ अखेर उलगडलं आहे. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर दोन हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती.
Nanded Crime News : नांदेडमधील (Nanded) बियाणी हत्याप्रकरणाचं (Biyani Murder Case) गूढ अखेर उलगडलं आहे. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर दोन हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती.
जवळपास अडीच महिन्यांपूर्वी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर दोन हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्येमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या हत्येनंतर नांदेड पोलिसांनी SIT गठीत केली होती. तर या SIT चे प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तसेच या हत्येचा उलगडा पोलिसांना लवकर होत नसल्यानं सदर तपास सीआयडीकडे देण्याची मागणी बियाणी कुटुंबियांनी आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्रालयाकडे केली होती. तर या हत्येविषयी पोलिसांनी तब्बल अडीच महिने अथक परिश्रम घेतले. अखेर या हत्याप्रकरणाचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ज्यात सात आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. संजय बियाणी हत्येप्रकरणी अडीच महिने तपासाची चक्रे फिरवत SIT प्रमुख विजय काबाडे यांच्या पथकानं पंजाबमधून एक तर सहा आरोपी नांदेडमधून ताब्यात घेतले आहेत. परंतु, संजय बियाणी यांच्यावर गोळ्या घालणारे या घटनेतील उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील दोन मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. हे दोन आरोपी उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर उत्तर प्रेदशातील आरोपींवर सहा गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून हरियाणाच्या आरोपींवर तब्बल 13 खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. ज्यात बियाणी आणि त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं. त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ माजली होती. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकांवर अंधाधुंद गोळीबार करून हत्या केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. नांदेड शहरातील गीता नगर परिसरात बियाणी हे आपली गाडी घरासमोर लावत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बियानी यांच्यावर तब्बल बारा गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तिथून पळ काढला होता. या घटनेमुळे गीता नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेमुळं व्यासायिकामध्ये भीतीचं पसरलं होतं.