(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed Crime News : भाच्याचा मामीवर जडला जीव; दोघांनी डाव आखून केली मामाची हत्या!
Beed Crime News : बीड जिल्ह्यात अनैतिक संबंधातून मामाची भाच्याने हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Beed Crime News : मामीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून भाच्यानेच मामाची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. माजलगाव तालुक्यातील बाभळगावच्या दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांचा आठ महिन्यापूर्वी अर्धवट मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता आणि हा मृतदेह नेमका कुणाचा हे शोधण्याच आव्हान पोलिसांसमोर उभं होतं. पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.
दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांचा आठ महिन्यापूर्वी अर्धवट मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. मृतदेहाच्या खिशामध्ये काही निराधार महिलांचे आधार कार्ड आढळले आणि त्यावरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. आधारकार्ड वरून महिलांकडे दिगंबर यांच्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी दिगंबर गाडेकर हे निराधार महिलांनी त्यांच्याबाबत माहिती दिली. या निराधार महिलांसाठी दिगंबर काम करत होते. त्यांनीच दिगंबर यांच्या गावाबाबत माहिती दिली.
दिगंबर यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच विहिरीमध्ये मृतदेहाचा दुसरा भाग शोधून काढला. मृतदेहाच्या शरीराचे दोन्ही तुकडे अंबाजोगाईच्या रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी दिगंबर यांचा हत्याच झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात मृत दिगंबर यांची पत्नी अनिता आणि त्यांचा भाचा सोपान मोरे हे दोघेही पळून गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या संशयाची सुई या दोघांकडे वळली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांबाबत माहिती जमवण्यास सुरुवात केली. दिगंबरची पत्नी अनिता आणि भाचा सोपान मोरे यांचे अनैतिक संबंध असल्याचे तपासात उघड झाले. याच अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या दिगंबरता काटा या दोघांनी मिळून काढला असल्याचे समोर आलं आहे.
कसा केला खून
आरोपी सोपान मोरेने त्याचा पुतण्या गणेश गाडेकर आणि बाळासाहेब घोगाने या तिघांनी दिगंबरच अपहरण केलं. त्याला जालना जिल्ह्याच्या सीमेवरील रिधोरी येथे असलेल्या एका बंधाऱ्याजवळ बांधून त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे पोत्यात भरून माजलगाव तालुक्यातल्या वारुळा शिवारातील एका विहिरीत टाकले. त्यानंतर तिघेही आपल्या गावी परत आले.
मागील आठ महिन्यापासून पोलीस दिगंबरचा खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते. त्यामध्ये पोलिसांना तपासामध्ये अनेक वेळा अडथळे आले. मात्र, दिगंबरची ओळख पटल्यानंतर तांत्रिक तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यातूनच पोलिसांनीही या आरोपीचा शोध लावला. पोलिसांनी आरोपी सोपान मोरे, गणेश गाडेकर आणि बाळासाहेब घोगाणे या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.