(Source: ECI | ABP NEWS)
Crime News : मुंबईत लपलेला पाकिस्तानी हेर कसा सापडला? ठाण्यात होतं घर, पाकिस्तानी तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
Crime News : मुंबई डॉकयार्डमधील अभियंता-तंत्रज्ञ रविकुमार वर्मा याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे आणखी एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मुंबई डॉकयार्डमधील अभियंता-तंत्रज्ञ रविकुमार वर्मा (35, रा. कळवा, ठाणे) याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी अटक केली. वर्मा भारतीय नौदलाची गोपनीय माहिती एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पुरवत होता. त्याच्या संपर्कातील आणखी दोन जणांविरोधातही शासकीय गुपिते अधिनियम (ओ.एस.ए.) आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहिती पुरविल्यानंतर पाकिस्तानातून मोठी रक्कम वर्माच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. मुंबईतील डॉकयार्डमधील हा कर्मचारी एका पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या संपर्कात होता. एटीएसच्या तपासात उघड झाले की, भारत सरकारने प्रतिबंधित केलेली अत्यंत संवेदनशील माहिती त्याने या गुप्तहेर महिलेला पुरवली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने वर्माची कसून चौकशी केली असता, नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुकवरून त्याची ओळख संबंधित पीआयओसोबत झाल्याचे निष्पन्न झाले. नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत त्याने व्हॉट्सअॅपद्वारे वेळोवेळी गोपनीय माहिती तिला पुरवली. या प्रकरणाचा अधिक तपास करताना एटीएसने वर्माला अटक केली. पुढील चौकशीनंतर त्याच्याच संपर्कातील इतर दोन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.
ठाण्यातील पाकिस्तानी हेर कसा अडकला?
रविकुमार वर्मा मागील पाच वर्षांपासून मुंबई डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता-तंत्रज्ञ म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. गेल्या दोन वर्षांत तो एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात आला. त्या महिलेने त्याच्याशी मैत्री करत, प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्याकडून भारतीय नौदलाशी संबंधित महत्त्वाची गोपनीय माहिती व्हॉट्सअॅपद्वारे मिळवली.
वर्मा अविवाहित असून ठाण्याच्या कळवा भागातील स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होता. चौकशीत असेही उघड झाले आहे की, त्याने दिलेल्या माहितीच्या बदल्यात पाकिस्तानातील संबंधित महिलेने त्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केली होती.
या व्यवहारात नेमकी किती रक्कम जमा झाली, ती कोणी आणि कुठून पाठवली, तसेच वर्माने अजून कोणकोणती माहिती दिली, याचा तपास सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे.
यापूर्वीचे पाकिस्तानी हनी ट्रॅप प्रकरणे
- 12 मार्च 2024 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्समधील कंत्राटी कामगार कल्पेश बायकर याला प्रतिबंधित क्षेत्रांबद्दल गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2021 ते मे 2023 या काळात संबंधित एजंटने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे त्याच्याशी संपर्क साधून माहिती मागवली होती. बायकरला नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले होते. तो 2014 पासून डॉकयार्डमध्ये कार्यरत होता.
12 डिसेंबर 2023 साली भारतीय नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटील (23) याला गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) एजंटांना पुरविल्याबद्दल अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या हस्तकांनी त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून, स्वतःला जहाजांची डिझाईन करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून फसवले होते. पाटीलने त्या बदल्यात पैसेही स्वीकारले होते.
- ऑक्टोबर २०२० मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नाशिक येथील संरक्षण विभागात कार्यरत असलेले सहायक पर्यवेक्षक दीपक शिरसाठ यांना भारतीय लढाऊ विमानांबद्दल गोपनीय माहिती पाकिस्तानी आयएसआय एजंटला पुरवल्याच्या आरोपाखाली एटीएसने अटक केली. ते साहित्याची तपासणी करत होते. त्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले असण्याचा संशय आहे.
- 4 मे 2023 साली डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना भारताच्या संरक्षण क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवल्याच्या आरोपावरून एटीएसने अटक केली होती.
आणखी वाचा
Jyoti Malhotra : पाकिस्तानच्या ISI चे हेरगिरी मॉड्यूल भारतात कसे काम करते? हनी ट्रॅपचा पॅटर्न काय?
























