व्यावसायिकाच्या घरात दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद, छत्रपती संभाजीनगर पोलीसांची मोठी कारवाई
Chhtrapati Sambhajinagar Crime Update: छत्रपती संभाजीनगरात व्यवसायिकाच्या घरात दरोडा पडला असून सोन्या-चांदीसह तब्बल 87 लाख 69 हजारांचा ऐवज लंपास केला होता. यावर पोलिसांनी चोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
Chhtrapati Sambhajinagar Crime Update: संभाजीनगरच्या एन-1 सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये अलिशान कारमध्ये आलेल्या चोरांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून व्यावसायिकाचे तब्बल 106 तोळे सोने, हिरेजडित दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच चोरांनी पसार केलेल्या दागिने जप्त केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या उच्चभ्रू वस्तीत घातलेल्या दरोड्यातील आरोपी रांजणगाव येथे असल्याचे समजल्यानंतर पोलीसांनी तीघांना ताब्यात घेतले आहे. ऋषीकेश काळे, रोहन भोळे आणि आकाश कोठे या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.
दरोडेखोरांचा पोलीसांना लागला शोध
शहरातील सिडको एन 1 भागात व्यावसायिकाच्या घरात पडलेल्या या दरोड्याबाबत गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरांचा शोध घेतला जात होता. दरम्यान गंगापुर, वैजापुर, येवला, नाशिक या परिसरातील अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींचा पोलीस शोध घेत होते.
याचवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, सिडको, एन-1 परिसरात झालेली घरफोडी ही नाशिक येथील रोहन भोळे याने त्याच्या साथीदारासह केली आहे.
दरोडेखोरांना ठाेकल्या बेड्या
तसेच त्यातील त्याचा एक साथीदार ऋषीकेश काळे हा सध्या संभाजीनगरच्या रांजणगाव येथे आहे. त्यावरून पोलिसांनी ऋषीकेश काळे बेड्या ठोकत त्याचे साथीदार रोहन भोळे आणि आकाश कोठे यांना देखील ताब्यात घेत अटक केली आहे.
दागिन्यांसह रोख रक्कम केली पसार
छत्रपती संभाजी नगरच्या सिडको एन वन भागात दरोडेखोरांनी सोने, हिरे, मोती व चांदीसह दागिने लंपास केले असून तब्बल 87 लाख 69 हजार रुपयांची रक्कमही पसार केली आहे. व्यावसायिकाने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, या दागिन्यांमध्ये त्यांच्या पत्नीला स्त्रीधन म्हणून मिळालेले दागिनेही होते. चाेरीला गेलेल्या ऐवजात सोन्या-चांदीसह हिऱ्याचेही दागिने होते.
खिडकीची लोखंडी गज कापून दरोडेखोर घरात
व्यवसायिक व घरातील कुटुंबीय बाहेर खरेदीला गेल्याचे पाहून दरोडेखोरांनी घरातील खिडकीची लोखंडी गज कापून घरात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. बाहेरून घरी आल्यानंतर घराचे मुख्य गेट खुले दिसून आले व घरातील लाईटही सुरू असल्याचे व्यावसायिकास दिसून आले. यानंतर घरात पाहणी केली असता गोदरेजचे लोखंडी कपाट फोडलेले आढळले. दागिन्यांसह 87 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. यानंतर अज्ञात दरोडेखोरांविरोधात व्यावसायिकाने सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा:
छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिकाच्या घरात दरोडा, सोन्या-चांदीसह तब्बल 87 लाख 69 हजार केले लंपास