संतापजनक! दोनदा कारावासाची शिक्षा भोगल्यानंतर तिसऱ्यांदा पोटच्या लेकीवर अत्याचार
Crime News : दुसऱ्यांदा शिक्षा भोगून आल्यावर त्याने पुन्हा तिसऱ्यांदाही मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नराधम पित्याने स्वतःच्या विवाहित मुलीवर तब्बल तीन वेळ अत्याचार (Rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा अत्याचार केल्यावर त्याला शिक्षा झाली, मात्र जेलमधून बाहेर आल्यावर त्याने दुसऱ्यांदा पुन्हा मुलीवर अत्याचार केला. तर, दुसऱ्यांदा अत्याचार केल्याने त्याला पुन्हा शिक्षा झाली. मात्र, दुसऱ्यांदा शिक्षा भोगून आल्यावर त्याने पुन्हा तिसऱ्यांदाही मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार एक 26 वर्षीय मुलगी आपल्या पती व तीन मुलांसह वाळूज महानगर परिसरात राहते. तिचा पती हा भोळसर असून, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात काम करतो. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी या मुलीचा बाप तिच्या सासरी आला. यावेळी त्याने मुलीच्या सासरच्या मंडळीसोबत वाद घातला. एवढंच नाही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझी मुलगी तुमच्याकडे ठेवत नाही म्हणून, आपल्या मुलीला बळजबरी संभाजीनगर शहरातील घरी घेऊन आला. मात्र, त्याचा मुलीला घरी आणण्याचा त्याचा उद्देश वेगळा. मुलीला घरी घेऊन आल्यावर त्याने तिच्यावर बळजबरी केली. स्वतःच्या वडिलांच्या या कृत्याचा तिला किळस येत होता. त्यामुळे वडील झोपी जाताच पिडीत मुलीने आपल्या मुलांना सोबत घेऊन तेथून पळ काढला. तसेच वाळूज भागातील एका सामाजिक कार्यकर्तीस घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने पिडीत मुलीला घेऊन थेट एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
दोनदा शिक्षा भोगून आल्यावर तिसऱ्यांदाह केला अत्याचार
पिडीत मुलीच्या आईचं 12 वर्षापूर्वीच निधन झाले असल्याने ती वडिलांसोबतच राहत होती. आईच्या निधनानंतर मुलगी 11 वर्षांची असताना नराधम पित्याची नियत फिरली आणि त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. मुलीने याबाबत नातेवाइकांना माहिती दिल्याने शहरातील उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने नराधम बापाला तीन वर्षांची कारावासाची शिक्षाही ठोठावली होती. संतापजनक म्हणजे शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने दुसऱ्यांदा मुलीवर अत्याचार केला. मुलीने पुन्हा पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा 9 वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, 9 वर्षांची शिक्षा भोगून आल्यावर त्याने परत पोटच्या मुलीवर अत्याचार केला.
इतर महत्वाच्या बातम्या :