माझ्याकडे साडेबारा कोटींचा बंगला, नोकरीची गरज नाही; कार्यालयात घुसून बोगस डॉक्टराची आरोग्य अधिकाऱ्याला धमकी
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी बोगस डॉक्टरांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : खोट्या कागदपत्रांच्या आधारे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरावर (Bogus Doctor) काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने (Health Department) कारवाई करत निलंबित केले होते. मात्र निलंबित करण्यात आलेल्या या बोगस डॉक्टराने चक्क उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयात घुसून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांना दमदाटी केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, जीवे मारण्याची धमकी देऊन कार्यालयातील कागदपत्रे फेकून दिली. या प्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी बोगस डॉक्टरविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर माझ्याकडे साडेबारा कोटींचा बंगला असून, मला नोकरीची गरज नाही असे म्हणत धमकी दिल्याचा देखील तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. मोहसीन खान असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे.
शेळके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, चार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची 3 मे रोजी डॉ. एकनाथ माले यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा या इमारतीत बैठक सुरू होती. दरम्यान त्यावेळी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याच्या आरोपात निलंबित करण्यात आलेला मोहसीन खान हा तिथे आला. त्याने माहितीच्या अधिकारात कंत्राटाविषयी माहिती मागितली होती. मला कोर्टात सदर कागदपत्रांची गरज आहे. तू माहिती दिली नाही तर तुला पाहून घेईन, अशी धमकी मोहसीन खान याने डॉ. शेळके यांना दिली.
तर ही घटना घडल्यानंतर काही वेळाने मोहसीन खान तेथे परत आला. त्याने डॉ. शेळके यांना शिवीगाळ केली. तसेच 38 हजारांच्या नोकरीला मी लाथ मारतो, असे म्हणत शेळके यांच्या टेबलावरील महत्त्वाची कागदपत्रे, फायली फेकून देऊन सरकारी कामात अडथळा आणला. तसेच माझ्याकडे साडेबारा कोटींचा बंगला आहे, जॅग्वार कार आहे, मला नोकरीची गरज नाही, असे सांगितल्याची माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे.
पोलीस संरक्षण देण्याची मागणी...
सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या या बोगस डॉक्टरने जीवे मारण्याची धमकी दिली असून, तो वारंवार 'तुझे खतम करूंगा' असे धमकावत आहे. त्यामुळे आपणास पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी वेदांतनगर ठाण्याच्या निरीक्षकांकडे केली आहे.
काय होते प्रकरण?
बनावट कागदपत्रांच्या आधारे मोहसीन खान याने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदाची नोकरी मिळवली. तो सिल्लोड तालुक्यातील अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाला होता. त्याच्या पदवीबाबत शंका आल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांनी भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्याकडे नोंदणीकृत वैद्यतेची तपासणी केली. तर महाराष्ट्र कौन्सिलने ते नोंदणीकृत नसल्याचे कळविले. त्यानंतर, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगानेही त्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे कळवले. त्यामुळे मोहसीन खानविरुद्ध सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :