'डी-गँग'विरोधात तपास यंत्रणा आक्रमक; दाऊदचा भाचा मुंबई सोडून दुबईला स्थायिक?
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या गँगच्या विरोधात तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतल्याने दाऊदच्या निकटवर्तीयांमध्ये, नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Dawood Ibrahim : तपास यंत्रणांनी भारतात डी-गँगविरोधात कारवाई सुरू केली आहे. तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईच्या धाकाने फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांमध्ये खळबळ उडाली आहे. डी-गँगच्या वाढत्या अडचणीमुळे दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह आता मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाल्याचे वृत्त आहे. काही महिन्यापूर्वीच ईडीने त्याची चौकशी केली होती. त्यामुळे अलीशाह याने ईडीच्या संभाव्य कारवाईला घाबरून दुबईत आसरा घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अलीशाह हा दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलगा आहे.
अलीशाह पारकर याची फेब्रुवारीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. या चौकशीनंतर तो लगेचच पत्नी आणि मुलीसह तो मुंबई सोडून दुबईला गेला. दुबईहून तो उमराहसाठी सौदी अरेबियाला गेला आणि नंतर तुर्कीला गेला आणि नंतर तेथून पुन्हा दुबईला परत आला. सध्या तो तिथेच स्थायिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ईडी अधिकाऱ्यांनी केलेल्या चार तास चौकशीमध्ये अलीशाह याला दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांबद्दल प्रश्न विचारले होते. त्याशिवाय दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचीदेखी स्वतंत्रपणे चौकशी केली होती. ईडीने इक्बाल कासकर याला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर हा मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमला मदत करत असल्याचा आरोप आहे. एका खंडणीच्या प्रकरणात 2017 मध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो ठाणे कारागृहात आहे. वर्ष 2019 मध्ये, इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान कासकर याला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये, ईडीने पुन्हा इक्बाल कासकरला ताब्यात घेत मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली.
मागील काही वर्षात अलीशाह याच्या अडचणी वाढत आहे. जुलै 2014 मध्ये हसीना पारकरचे निधन झाल्यानंतर अलीशाह हा खचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हसीना पारकरविरोधातही मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या भावाच्या नावावर तिने खंडणी जमा केली असल्याचा ठपका तिच्यावर होता.
आई हसीना पारकर आणि मामा दाऊद इब्राहिम, इक्बाल कासकरविरोधात गुन्हे दाखल असले तरी अलीशाह विरोधात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. त्याशिवाय त्याचा कोणत्याही गुन्ह्यात सहभाग पोलिसांना आढळला नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर छापासत्र सुरू केले आहे. त्यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपास यंत्रणांकडून होणाऱ्या संभाव्य चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अलीशाह याने दुबईत पळ काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.