BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
Bhiwandi Robbery News : अलिशान बीएमडब्लू कारमधून दरोडा टाकण्यासाठी पाच जण पूर्ण तयारीसह आले होते. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली तर एक जण फरार आहे.

ठाणे : चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. दुचाकीवरून चेन ओढणारे, घरात घुसून दरोडा टाकणारे किंवा शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणारे चोरटेही आपण ऐकले असतील. परंतु बीएमडब्ल्यूसारख्या अलिशान कारमध्ये फिरून दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांची कल्पनाही कठीण. मात्र भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. बीएमडब्ल्यू कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
या गाडीत एकूण पाच दरोडेखोर होते. त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. या टोळीच्या ताब्यातून एक बीएमडब्ल्यू कार, दोन गावठी कट्टे, दोन पिस्टल, मिर्ची पूड, पक्कड, मोबाइल आणि इतर साहित्य असा एकूण 17 लाख 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, ही टोळी भिवंडीमध्ये मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य गुन्हा टाळला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
गस्त घालत असताना माहिती मिळाली
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत होते. वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदान जवळ रस्त्याच्या बाजूला पाच व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली.
चार आरोपी अटकेत, एक फरार
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे, सहा. पोलिस निरीक्षक योगेश गायकर व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित बीएमडब्लू कार जवळ गेले असता त्या कार चालकाने कार पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून बीएमडब्लू कार क्रमांक एम.एच.02 बी. झेड.5671 थांबविली. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला.
17 लाखांचा मुद्देमाल जप्त
कारमधील शोएब शाहीद शेख, नौशाद मक्सुद आलम खान, अफताब अफसर शेख, शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेवून त्यांच्या कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या जवळ दोन देशी बनावटीचे कट्टे, दोन देशी बनावटीचे पिस्टल, एक लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड, दोरखंड, कपड्यांचे तीन मास्क, मिरची पुड, एका पिशवी मध्ये पांढऱ्या रंगाचे 4 जोड हॅन्डग्लोज, चाकू, सेलो टेप, मोबाईल व एक बी.एम.डब्ल्यु कार असा एकूण 17 लाख 35 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणयात आला.
या आरोपींना पकडून त्यांच्या विरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून शनिवारी सकाळी भिवंडी न्यायालयात हजर केले. या सर्व आरोपींना 4 जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
























