(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi News : भिवंडीत सामूहिक बलात्कार; अल्पवयीन मुलीवर तीन जणांकडून अत्याचार
अल्पवयीन मैत्रिणीचे एका इमारतीतील बेडरूममध्ये हातपाय बांधून तिच्यावर जबरदस्ती करुन आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भिवंडी : 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील एका सोसायटीत गावात घडली आहे. अल्पवयीन मैत्रिणीचे एका इमारतीतील बेडरूममध्ये हातपाय बांधून तिच्यावर जबरदस्ती करुन आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिघानराधमाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश कनोजिया (22), साहिल मिश्रा (21), सचिन कांबळे (35) अशी बेड्या ठोकलेल्या तिघा नराधमांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय तरुणी ठाण्यातील वर्तकनगर भागात कुटुंबासह राहत असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याच दरम्यान मुख्य आरोपी आकाशशी तिचे मैत्रीचे संबंध होते. मुख्य आरोपी आकाश हा ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल भागात राहणार आहे. तर त्याचे दोन मित्र आरोपी सचिन आणि साहिल वागळे इस्टेट भागात राहतात. 26 ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारच्या सुमारास नराधम मुख्य आरोपीने पीडितेला चितळसर ठाणे येथून भिवंडीतील काल्हेर येथील एका सोसायटीच्या बिल्डिंगमधील रूमवर आणले. त्यानंतर तिघांनी बेडरूममध्येच पीडितेचे हात बांधून तिच्यावर जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला. शिवाय तिने प्रतिकार केला असता तिला बुक्क्यांनी मारहाण करून तिच्या गुप्तांगाला चावा घेऊन जखमी केले.
या घटनेनंतर भयभीत झालेल्या पीडित तरूणीने घरी जाऊन तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच नातेवाईकांना धक्काच बसला. नातेवाईकांनी तिला 28 ऑगस्ट रोजी प्रथम ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा भिवंडीत वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी भादवि कलम 376 (ड), 323, 506 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आज तिघांना भिवंडीतील काल्हेर गावातील एका सोसायटीमधून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
आज सायंकाळच्या सुमारास मुख्य आरोपी आकाश याला घटनास्थळी नेऊन पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. त्यानंतर तिघांची शासकीय रुग्णालयात तपासणी करून पोलीस कोठडीत डांबले आहे. या तिन्ही नराधमांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिक तपास नारपोली पोलीस करत आहेत.