Bhiwandi News: भिवंडीत 7 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून बेदम मारहाण, आरोपी नराधमाला शेजारच्यांकडून चोप
पीडित मुलीच्या पालकांसोबत नराधम शेजाऱ्याशी काही दिवसांपासून शुल्लक कारणावरून वाद सुरू होता. या रागातून नराधमानं सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग करुन तिला बेदम मारहाण केली आहे
भिवंडी : अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या किरकोळ वादावरुन एका नराधमानं सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग करुन तिला बेदम मारहाण केली आहे. भिवंडी (Bhiwandi News) शहरात ही घटना घडली आहे. विनयभंग करत असताना या चिमुकलीनं आरडाओरडा केल्यानं आसपासच्या नागरिकांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला. त्यानंतर शेजारच्या नागरिकांनी या नराधमाला चांगलाच चोप दिला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. इरफान हसीफ शेख असं या आरोपीचं नाव आहे.
याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पॉक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. इरफान हसीफ शेख (वय 35) असे अटक केलेल्या नराधम शेजाऱ्याचे नाव आहे. या घटनेने भिवंडी शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीचे वडील आणि आरोपी नराधम इरफान हे दोघेही शेजारी राहत आहेत. त्यातच पीडित मुलीच्या पालकांसोबत नराधम शेजाऱ्याशी काही दिवसांपासून शुल्लक कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान पीडित कुटुंबाची मुलगी नवीवस्ती परिसरातील एका खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे.
अल्पवयीन शाळकरी मुलगी शुक्रवारी सायंकाळी घरी परतत असताना नराधमाने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भांडणाचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या पीडित कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा हात एका इमारतीजवळ पकडून तिला ओढले. या घटनेमुळे पीडित मुलीने रडण्यास सुरुवात केल्याने नराधमाने तिला गप्प करण्यासाठी मारहाण करत तिचा चेहरा भिंतीवर आपटले. या मारहाणीत शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दुसरीकडे नागरिकांनी नराधमाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी नराधम इरफान यास पकडून त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका करत त्यास बेदम चोप दिला आहे. तर जखमी शाळकरी मुलीला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आले आहे. घटनेची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत नराधम इरफानला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भादंवि कलम 354,324 सह पोक्सो कलम 8,12 अंतर्गत गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत. नराधमाला न्यायालयात हजर केले असता 29 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर करत आहेत.
हे ही वाचा :