Bhiwandi : भिवंडीतील अल्पवयीन युवकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक, पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचे उघड
Bhiwandi Murder : आधी झालेलं भांडण मिटवायचं आहे असं सांगत रवी शर्मा या अल्पवयीन मुलाला काल्हेर खाडीवर बोलवण्यात आलं आणि त्याची हत्या करण्यात आली होती.

ठाणे : भिवंडी तालुक्यातील काल्हरे येथे खाडी किनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरून पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात नारपोली पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
काल्हेर येथे राहणारा 16 वर्षांचा योगेश रवी शर्मा यास 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोबाईल फोन करून काल्हेर खाडी किनारी बोलावून त्याची चाकू आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तेथील निर्जन स्थळी आगोदरच खड्डा खोदून ठेवलेल्या ठिकाणी योगेशचा मृतदेह पुरून ठेवला होता. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना काही संशयितांची नावे समोर आली.
त्यानुसार पोलिसांनी कामतघर भागात राहणारे आयुष झा, मनोज टोपे यांना तब्बल बारा दिवसांनंतर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली देत मृतदेह ज्या ठिकाणी पुरून ठेवला होता ती जागा दाखवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अधिक तपास केला असता कामतघर येथील ब्रह्मानंद नगर येथे सहा महिन्यापूर्वी हत्या करणाऱ्या युवकांसोबत हत्या झालेल्या युवकाच्या गटासोबत हाणामारी झाली होती असं समोर आलं. या हाणामारीचा राग मनात ठेऊन पूर्ववैमनस्यातून हत्या करण्याचा कट रचून योगेश यास भांडण मिटविण्यासाठी बोलावून ही हत्या केली .
त्यानंतर नारपोली पोलिसांनी दोन पथक बनवून इतर ठिकाणी फरार झालेले अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामुल या तिघा जणांना ताब्यात घेतल्याने हत्येच्या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे. या हत्येच्या गुन्ह्यात अजून काही आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर हत्या झालेला योगेश हा समाज माध्यमांवर उज्जैन येथील कुप्रसिद्ध दुर्लभ कश्यप याचा फॉलोअर असल्याचे समोर आल्याने त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
