रिक्षातून गांजाची तस्करी, पोलिसांनी 10 किलो गांजासह रिक्षा केली जप्त, आरोपीला बेड्या
सलीम इब्राहीम खान असे अटक रिक्षा चालकाचे नाव आहे.
ठाणे : मुंबई,पुण्यासह ठाणे जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या विक्रीचा, तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, गेल्या काही महिन्यात येथील ड्रग्ज आणि अंमली पदार्थ्यांच्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री वाढली असतानाच दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने ज्या परिसरातून सुमारे एक किलो वजनाचा गांजा पकडला होता. त्याच परिसरात शांतीनगर पोलिसांनी 10 किलो गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका रिक्षाचालकास ताब्यात घेतले आहे. सलीम इब्राहीम खान असे अटक रिक्षा चालकाचे नाव आहे.
भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व त्यांचे पोलिस पथक गस्त घालत होते. त्यावेळी, भादवड पाईपलाईन येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला एका रिक्षामध्ये एक व्यक्ती संशयास्पद पद्धतीने बसलेला दिसून आला. पोलिस पथकास संबंधित व्यक्तीवर संशय आल्याने रिक्षाची तपासणी केली असता रिक्षात 3 लाख 15 हजार रुपयांचा 10 किलो 430 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी सलीम इब्राहीम खान, वय 38 रा.दुधनाका, रेतीबंदर रोड, कल्याण यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळील रिक्षा व मोबाईल असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सलीम इब्राहीम खान याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास 17 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हेही वाचा
भाजपात जाण्यासाठी गडबड झाली का?; अशोक चव्हाणांनी दिलं उत्तर, विधानसभेबाबतही बोलले
''एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल''; योगी आदित्यनाथ कडाडले