बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड; सापळा रचत पोलिसांकडून पर्दाफाश
आष्टी तालुक्यातील शिराळा येथील एका तरुणाला लग्न लावून देतो म्हणून या टोळीने आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. ठरल्या प्रमाणे 9 मार्च रोजी एका महिलेशी या तरुणाचं लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ही महिला तिच्या नातेवाईकांची तब्येत खराब असल्याचा बनाव करून माहेरी निघून गेली आणि तेथूनच या तरुणाकडे 2 लाख रुपयांची मागणी करू लागली.
बीड : जिल्ह्यातल्या आष्टी पोलिसांनी बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दा फाश केला आहे. लग्नाच वय झालेल्या तरुणांना जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करून नंतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम ही टोळी करत होती. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील शिराळा येथील एका तरुणाला लग्न लावून देतो म्हणून या टोळीने आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. ठरल्या प्रमाणे 9 मार्च रोजी एका महिलेशी या तरुणाचं लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ही महिला तिच्या नातेवाईकांची तब्येत खराब असल्याचा बनाव करून माहेरी निघून गेली आणि तेथूनच या तरुणाकडे 2 लाख रुपयांची मागणी करू लागली. गरीब कुटुंबातील असलेल्या या तरुणांकडे महिलेला देण्यासाठी पैसे नसल्याने या महिलेने त्याला ब्लॅकमेल करत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकरणानंतर आपली फसवणूक झाल्याचं या तरुणाच्या लक्षात आलं. त्याने थेट आष्टी पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेली आपबीती पोलिसांना सांगितली.
आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाल चाऊस यांनी तक्रारीची दखल घेऊन आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला पोलिसांच्या सांगण्यावरून तक्रारदार तरुणाने महिलेला 50 हजार रुपय देतो म्हणून आष्टीला बोलावून घेतलं त्याप्रमाणे महिला आणि तिचा एक साथीदार आष्टीत आले असता पोलिसांनी तिथेच त्यांना अटक केली. त्यांना या कामात मदत करणाऱ्या एजंटला देखील पोलिसांनी जामखेडमधून ताब्यात घेतलं आहे.
यामध्ये नवऱ्या मुलीची भूमिका बजावणाऱ्या या महिलेने आतापर्येंत 8 ते 10 जणांसोबत बनावट लग्न करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या टोळीतले तिघेजण सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिघेही एकमेकांशी बनावट नातेसंबंध सांगून तरुणाची फसवणूक करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणी राज्यात मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने आता आष्टी पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :