Beed Crime: बीड पोलिसांनी कळंबच्या त्या महिलेच्या दोन मारेकऱ्यांना पकडले, समोर येणार महत्त्वाची माहिती
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात एका महिलेचा सातत्याने उल्लेख होत होता. या महिलेशी संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध दाखवण्याचा कट रचण्यात आला होता.

बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध असलेल्या कळंबमधील महिलेचा मृतदेह चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी आता बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावे आहेत. कळंब पोलिसांत या दोघांविरोधात पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील असल्याचे समजते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणारा असल्याचा आरोप झाला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे दाखवून याप्रकरणाला वेगळे वळण देण्याचा डाव होता, असा दावा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला होता. त्यामुळे या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु झाला असताना या महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. अशातच बीड पोलिसांनी या महिलेचा मृतदेह कुजल्यामुळे घरातच या महिलेचे शवविच्छेदन केले होते. त्यानंतर या महिलेचे अंत्यसंस्कारही झटपट उरकण्यात आले होते. या सगळ्यामुळे बीड पोलिसांभोवती पुन्हा एका संशयाचे धुके निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी महिलेच्या दोन मारकेऱ्यांना केलेली अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून महिलेच्या मृत्यूबाबत कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्यावर मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आता या महिलेच्या हत्येचा घटनाक्रम आणि नेमके कारण समोर येण्याची वाट पाहिली जात आहे. याबाबत आता बीड पोलीस काय माहिती देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मस्साजोगच्या गावकऱ्यांचा आरोप
सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना बीड पोलिसांनी रचलेल्या कटाबद्दल सांगितले होते. संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले. पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आले आहे तिथपासून त्यांचा मृतदेह केजमध्ये आणून टाकेपर्यंत सगळे काही माहिती होते. गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडे एक रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न नेता कळंबच्या दिशेने नेण्यात आला. तिकडे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते. या महिलेशी संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते, त्यांच्यातील वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली, असे बीड पोलिसांना दाखवायचे होते. मात्र, मस्साजोग गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्याने हा प्लॅन फसला, असे गावकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितले होते.
आणखी वाचा























