Baramati : बॅंक ऑफ बडोदाच्या 9 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, फसवणूक केल्याचा आरोप
Baramati Latest News : न्यायालयाच्या आदेशानुसार बँक ऑफ बडोदामधील नऊ अधिकाऱ्यांविरोधात बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Baramati Latest News : न्यायालयाच्या आदेशानुसार बँक ऑफ बडोदामधील नऊ अधिकाऱ्यांविरोधात बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लोणीकाळभोर येथील सूर्या ट्रॅक्टर या ट्रॅक्टर वितरकाची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार बँक ऑफ बडोदाच्या 9 अधिकाऱ्यांविरोधात बारामतीत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोणीकाळभोर येथे सूर्या ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर वितरक आहेत. त्यांची बारामतीतही शाखा आहे. या शाखेचे व्यवस्थापक मनोहर बबनराव खैरे यांनी बारामती न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्यातील सुनावणीनंतर प्रथमदर्शनी तथ्य दिसल्याने न्यायालयाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, बारामती शहर पोलीस ठाण्यात बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये यू.एम. बाजी, अवनिश कुमार, जयकिसन रोडा, चूक साहेब, वैभव पाटील, संदीप माळी, अजय गुप्ता, विरेंद्र रावखंडे, नागेश्वर राव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सूर्या ट्रॅक्टर कंपनीने सन 2015 मध्ये बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घेतले होते. यामध्ये खैरे हे यातील दोन कोटी रुपयांना जामीनदार होते. तर पाच कोटी रुपये बँक गॅरंटी होती. दरम्यान या कर्जावेळी बडोदा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी खैरे यांच्या विविध कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. त्यामध्ये काही कागदपत्रे ही कोरी होती. बँकेचे 12 कोटी रुपये कर्ज मंजूर झाले होते. कंपोझिट हायपोथेकेशन करारात मात्र हे कर्ज 7 कोटी रुपयांचे होते. 2 कोटी रुपयांचे कर्ज समजून खैरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
बँकेने कागदपत्राचा वापर करून पाच कोटी रुपयांची बँक गॅरंटी कर्जाला जोडली होती. मात्र बँकेने सूर्या ट्रॅक्टर्स कंपनीला फक्त 2 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. दरम्यान सूर्या ट्रॅक्टर कंपनीस केवळ 2 कोटी रुपयांचे कर्ज दिले असताना प्रत्यक्षात बँकेने 7 कोटी रुपये कर्ज व त्यावरील व्याज असे 18 कोटी रुपयांची मागणी खैरे यांच्याकडे केली होती. ज्या बँक गॅरंटीला खैरे हे जामीनदार नव्हते, त्या रकमेची बँकेने मागणी करण्यास सुरवात केली. त्यामुळे खैरे यांनी तात्काळ न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सर्वा बाबींची पडताळणी करत सूर्या ट्रॅक्टर्सच्या बाजूनं निर्णय देत नऊ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
आणखी वाचा :
Crime News : धक्कादायक...! ड्युटीवर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात दरोडा, दीड लाखांचा ऐवज लंपास