Badlapur school Case: अक्षय शिंदे गतीमंद होता का? आई म्हणाली, लहानपणापासून डोक्याने थोडा कमजोर; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट
Crime news: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. अक्षय शिंदे याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
बदलापूर: बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळू शकते आणि तपासाची संपूर्ण दिशाही बदलू शकते. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांशी 'एबीपी माझा'ने फोनवरुन संपर्क साधला. यावेळी अक्षय शिंदे याच्या आईने अनेक महत्त्वाचे खुलासे केले. अक्षय हा शाळेत फक्त बाथरुम धुवायचे काम करायचा. बाकी त्याच्याकडे कोणतंच काम नव्हतं, असे अक्षयच्या आईने सांगितले.
अक्षय शिंदे हा गतीमंद होता का, असा प्रश्नही त्याच्या आईला विचारण्यात आला. यावर त्याची आई म्हणाली की, नाही, पण त्याला छातीचं दुखणं होतं. तो लहानपणापासून डोक्याने कमजोर आहे. त्याला काही औषधगोळ्या सुरु होत्या, अशी माहिती अक्षय शिंदे याच्या आईने दिली.
आमचं कुटुंब शाळेत साफसफाईचं काम करायचं, अक्षय शिंदेच्या आईने काय-काय सांगितलं?
अक्षयला आदर्श शाळेत कामाला लागून 15 दिवस झाले होते. 13 तारखेला लहान मुलींबाबत असा प्रकार घडल्याचे मला समजले. 17 तारखेला पोलीस अक्षयला घेऊन गेले. मला शाळेत काम करणाऱ्या बाईने याबाबत सांगितले. मी धावत तिकडे गेले तेव्हा पोलीस अक्षयला मारत होते. त्यानंतर पोलीस अक्षयला चौकीत घेऊन गेले. त्यांनी आम्हाला अक्षयने लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. पण अक्षय शाळेत फक्त बाथरुम धुवायचे काम करायचा, बाकी काही काम त्याच्याकडे नव्हते. तो सकाळी 11 वाजता शाळेतील बाथरुम धुवायचा. तिकडचं काम झाल्यावर तो समोरही बाथरुम धुवायला जायचा. आमचं कुटुंब हाऊसकिपिंगचं काम करायचं. आदर्श शाळेत आम्ही झाडलोट करण्याचे कामही करायचो. आम्ही संध्याकाळी शाळा सुटल्यावर साडेपाचला आत जायचो आणि साडेआठ वाजता बाहेर यायचो, अशी माहिती अक्षयच्या आईने दिली.
अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड
अक्षय शिंदे हा बदलापूरमधील खरवई गावात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. बुधवारी खरवईतील ग्रामस्थांनी अक्षयच्या घरी जात सामनाची नासधूस केली. तसेच अक्षयच्या कुटुंबीयांना गावातून हुसकावून लावले. गावकऱ्यांनी आम्हाला मारुन-मारुन घराबाहेर फेकून दिले. आम्हाला काही बोलून दिले नाही. इकडे राहायचं नाही, असे त्यांनी सांगितल्याची माहिती अक्षय शिंदे याच्या वडिलांनी दिली.
आणखी वाचा
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
बदलापूर अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा सनसनाटी दावा, माझ्या मुलाला...