Baba Siddique Death Case : बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना दुचाकी कशी मिळाली? पुण्यात खरेदी करुन मुंबईत पोहोचवली, 60 हजार कुणी खर्च केले? माहिती समोर
Baba Siddique Death Case Update : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.
मुंबई : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी हरीशकुमार निषाद या आरोपीला उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील कैसरगंज येथून अटक केली. त्याला देखील 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुरमैल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकरला अटक केली आहे. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे. शुभम लोणकरच्या फेसबुक अकाऊंटवरुन बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती.
हरीशकुमार निषाद हा पुणे शहरात भंगारचं दुकान चालवतो. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार एका वर्षापासून ते दुकान तो भाडेतत्त्वावर चालवत होता. ते दुकान गेल्या दोन आठवड्यांपासून बंद होतं. प्रवीण लोणकरच्या डेअरी जवळचं ते दुकान आहे. प्रवीण लोणकरला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.हरीशकुमार निषादनं काही जणांना त्याच्या उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमधून पुण्यात भंगारच्या दुकानात कामासाठी आणलं होतं.
बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणात मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी त्यांना कशी मिळाली हे देखील समोर आलं आहे. हरीशकुमार निषादनं 60 हजार रुपयांना दुचाकी खरेदी केली होती. ते 60 हजार रुपये प्रवीण लोणकरनं निषादला दिले होते. हरीशकुमार निषाद याने ती गाडी पुण्यात खरेदी केली आणि तो पुण्याहून मुंबईला रस्ते मार्गे आला. निषादनेच ती गाडी मुंबईत कुर्ला येथे राहणाऱ्या मारेकऱ्यांना दिली. बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणाऱ्यांना त्या दुचाकीचा वापर रेकी करण्यासाठी केला होता, हे निषाद कडील कागदपत्रांमधून स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आहे.
शुभम लोणकरनं कथितरित्या प्रवीण लोणकरला 4 लाख रुपये दिल्याची माहिती आहे. प्रवीण लोणकरने ते शूटर्सला आणि हत्येचा कट रचणाऱ्या इतरांमध्ये वाटल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांना वांद्रे पूर्वमध्ये जिथं बाबा सिद्दिकींवर गोळीबार करण्यात आला तिथं एक बॅग सापडली. त्यामध्ये एक बंदूक आणि कागदपत्र सापडल्याची माहिती आहे. बाबा सिद्दिकींवर हल्ला केल्यानंतर पळून जाताना ती बॅग मारेकऱ्यांकडून तिथेच पडली होती.
मोहम्मद झीशान अख्तर हा आरोपी देखील फरार आहे. झीशान अख्तर हा विक्रम ब्रारच्या टोळीसाठी काम करतो. शुभम लोणकर पंजाबला गेला होता तिथं तो झीशनला भेटला होता.
लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीसाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनं यापूर्वी 14 एप्रिल 2024 ला सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ऑगस्ट 2023 च्या सीआरपीसी कोडच्या सेक्शन 268 नुसार बिश्नोईला साबरमती तुरुंगाबाहेर कोणत्याही कारणासाठी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी एकदा लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीसाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या:
Baba Siddique: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात गुप्तचर यंत्रणा सपशेल फेल, मुंबई पोलीस दलात कुजबुज