10 रुपयाच्या फाटक्या नोटवरुन वाद, रात्रीत येऊन जाळलं दुकान; आरोपीला अटक
ही घटना रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास कोठी रोडवरील हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी विजय दिलीप झेंडे (रा. नगर कॉलेजजवळ, नगर) यास कोतवाली पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले
अहमदनगर : अनेकदा किरकोळ वादातून किंवा बाचाबाचीतून मोठ्या भांडणाच्या घटना घडतात. काहीवेळा किरकोळ वादातून थेट हत्या किंवा हत्येचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यापर्यंतच्या घटना घडतात. तर, सुट्टै पेसै किंवा चिकटवलेल्या नोटांवरुन कधी बसमध्ये कंडक्टरशी, तर कधी बँकेत (Bank) वा दुकानादाराशी वाद झाल्याच्या घटनाही पाहायला मिळतात. मात्र, 10 रुपयांच्या फाटक्या नोटावरुन झालेल्या वादातून चक्क दुकानच जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोठी रोडवरील ही घटना आहे. दुकानदाराने दहा रुपयांची फाटकी नोट न घेतल्याचा राग मनात धरून एकाने चक्क दुकानच पेटवून दिले.
रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास कोठी रोडवरील हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी विजय दिलीप झेंडे (रा. नगर कॉलेजजवळ, नगर) यास कोतवाली पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडीही देण्यात आली आहे.याप्रकरणी रंजना अजय बसापुरे (रा. माळीगल्ली, केडगावेस, नगर) यांनी फिर्याद दिली होती. अहमदनगर-पुणे रोडवरील कोठी येथे रंजना बसापुरे यांच्या मालकीचे महावीर दूध डेअरी व जनरल स्टोअर्स आहे.आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या डेअरी व जनरल स्टोअर्सचे दुकान चालवतात. याप्रकरणातील आरोपी विजय झेंडे हा दुपारी त्यांच्या दुकानात आला होता. त्यावेळी, त्याने खिशातून दहा रुपयांची नोट दुकानदार महिलेस दिली. मात्र, ही नोट फाटकी असल्याने दुकानदाराने ती घेण्यास नकार नाही. दुकानदाराने 10 रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने ग्राहक व दुकानदारामध्ये बाचाबाची झाली. या घटनेचे पडसाद मोठ्या घटनेत उमटल्याचे दिसून आले.
आरोपी विजयने फाटकी नोट न घेतल्याच्या कारणावरून झालेला वाद मनात ठेवला. त्याच दिवशी रात्री 10 वाजताच्या सुमारास आरोपी दुकानात आला व त्याने ऑइलच्या सहाय्याने संबधित दुकानाला आग लावली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, दुकानदाराचे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत असून किरकोळ वादातून घडलेल्या घटनेवर सोशल मीडियातूनही प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येते.