Mumbai Drugs Case: मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई, एक हजार कोटींचे 513 किलो ड्रग्ज जप्त
Mumbai Drugs Case : मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये धडक कारवाई करत सुमारे एक हजार कोटी किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केले जात होते.
Mumbai Drugs Case : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये कारवाई केली आहे. गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. यावेळी मारलेल्या छाप्यात मुंबई पोलिसांनी जवळपास 513 किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या अंमली पदार्थाची किंमत 1026 कोटी रुपये आहे. यावेळी पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे.
मागील काही महिन्यापासून मु्ंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी शिवाजी नगर भागातून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. पोलिसांनी गोवंडीतील शिवाजी नगर येथून मार्च 2022 मध्ये पहिल्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 250 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी 700 किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करताना अंमली पदार्थ पुरवठ्याचे धागेदोरे गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील अंकलेश्वर भागात कारखान्यावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी 513 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. त्यातील पाच जणांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले. तर दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपवण्यात आले आहे.
अंमली पदार्थाची तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असावी असा पोलिसांनी संशय आहे. ही टोळी काही राज्यांमध्ये कार्यरत असून युवकांना लक्ष्य करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. उच्चभ्रू वर्तुळात एमडी ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही महिन्यांपासून गुजरातमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गुजरातमध्ये सहा महिन्यात पाच हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर गुजरात एटीएसनं कोस्ट गार्डच्या मदतीनं ड्रग्ज माफियांविरोधात इतिहासातील सगळ्यात मोठी संयुक्त मोहीम पूर्ण केली. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात NDPS ACT अंतर्गत 422 गुन्हे दाखल केले आणि जवळ जवळ 667 ड्रग्स माफियांना तुरुंगात टाकलं. त्यांच्याकडून 25 हजार 699 किलो ड्रग्ज जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत जवळ जवळ पाच हजार कोटी रुपये आहे.