(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ankita Murder Case : 'रिसार्टमध्ये सुरु होती देहविक्री अन् अंमली पदार्थांचे अवैध धंदे'; हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्याचा दावा
Ankita Bhandari Murder Case : उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. पुलकितच्या रिसॉर्टमध्ये देहविक्री, अंमली पदार्थ यांसारखे अवैध धंदे सुरु असल्याचा दावा या दाम्पत्यानं केला आहे.
Ankita Bhandari Murder Case : उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणी (Ankita Bhandari Case) नवीन अपडेट समोर आली आहे. अंकिता भंडारी पुलकित आर्यच्या रिसॉर्टमध्ये काम करत होती. तिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या प्रकरणात पुलकित आर्य अटकेत आहे. या प्रकरणात आता रिसॉर्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी नवा खुलासा केला आहे. आरोपी पुलकितच्या रिसॉर्टमध्ये देहविक्री, अंमली पदार्थ यांसारखे अवैध धंदे सुरु असल्याचा दावा या दाम्पत्यानं केला आहे. रिसॉर्टमधील अवैध धंद्यांची माहिती मिळाल्याने या दाम्पत्याने रिसॉर्टमधील नोकरी सोडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अंकिता भंडारीवर रिसॉर्टमध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं व्हॉट्सअप चॅटच्या तपासाअंती समोर आलं आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.
अंकिता हत्याकांड प्रकरणात आता रिसॉर्टमध्ये काम करणारे मेरठचे रहिवासी विवेक भारद्वाज आणि त्याची पत्नी इशिता यांनी मोठा खुलासा केला आहे. या दाम्पत्याने सांगितलं आहे की, ते सहा महिन्यांआधी या रिसॉर्टमध्ये नोकरीला होते. इशिता फ्रंट ऑफीस मॅनेजर आणि विवेक रुम सर्विस मॅनेजर म्हणून नोकरीला होते. यावेळी रिसॉर्टमध्ये अनेक काळे धंदे सुरु होते. यामध्ये देहविक्री, ड्रग्ज पार्टी यांचा समावेश आहे. रिसॉर्टमध्ये देहविक्रीसाठी बाहेरून तरुणी आणल्या जायच्या. त्यांना रिसॉर्टमधील पाहुण्याच्या 'विशेष इच्छा' पूर्ण करण्यास सांगितलं जायचं. हे सर्व पाहून या दाम्पत्याने या रिसॉर्टमधील नोकरी सोडली.
काय आहे अंकिता भंडारी हत्या प्रकरण?
उत्तराखंडमध्ये पुलकित आर्य याच्या वनतारा रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी ही तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होती. अंकिताचं वय 19 वर्ष होतं. ती पाच दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर तिचा मृतदेह ऋषिकेशमधील नदीत सापडला. आरोपी पुलकित आर्य आणि त्याच्या मित्रांवर अंकिताची हत्या केल्याचा आरोप आहे. पुलकित आर्य हा भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा असून या प्रकरणानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीचा भाऊ अंकित आर्य यांनाही भाजपने पक्षातून काढून टाकलं आहे. तिन्ही आरोपींना जमावानं बेदम मारहाण केली होती. सध्या तिन्ही आरोपी अटकेत आहेत. अंकिताला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांकडून अनेक आंदोलन आणि निदर्शन करण्यात आली.
पुलकितसोबत ऋषिकेशला गेली होती अंकिता
अंकिता पुलकित आणि त्याच्या मित्रांसोबत रिसॉटमधून निघून ऋषिकेशला जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. अंकिता पुलकित आणि त्याच्या मित्रांसोबत गेली पण, तेथून परतली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, अंकित, पुलकित आणि त्याचे मित्र असे चौघे जण ऋषिकेशमध्ये फिरण्यासाठी गेले होते. यावेळी पुलकित आणि त्याच्या मित्रांनी मद्यपान केलं. त्यानंतर त्यांनी अंकितावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. पण अंकिताने त्यांना विरोध केला आणि हे सर्वांना सांगेन अशी धमकी देऊ लागली. यानंतर पुलकित आणि त्याच्या मित्रांनी नदीत ढकलून तिची हत्या केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या