टिप्परने धडक दिली, छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल रस्त्यावर पडले; पोलिसांनी जप्त केले 7 कोटी रुपये
आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. कारण, शुक्रवारीच एनटीआर जिल्ह्यात 8 कोटी रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते
हैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. यापूर्वी ईडी (ED), सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जात होती. मात्र, निवडणूक काळात पोलिसांच्या (Police) नाकाबंदी आणि प्रचार यंत्रणेदरम्यान होत असलेल्या तपासातही रोकड आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी मतदारांना (Voter) वाटण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरण्यात येत असलेली अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. आता, आंध्र प्रदेशातही 7 कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. कारण, शुक्रवारीच एनटीआर जिल्ह्यात 8 कोटी रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. आता, राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये लपवून 7 कोटी रुपये नेण्यात येत होते. टाटा एस या छोटा हत्ती वाहनातून ही रक्कम नेली जात होती. मात्र, नल्लाजर्ला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रॅक्टर ट्रॉलीसोबत छोटा हत्तीची धडक झाली. या धडकेमुळे छोटा हत्तीमधून नेण्यात येत असलेले बॉक्स खाली पडले, मात्र ह्या बॉक्समधून चक्क नोटांचे बंडलच रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं.
छोटा हत्ती वाहनात ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये काही पुठ्ठयांचे बॉक्स होते, ज्यामध्ये रोकड ठेवण्यात आली होती. मात्र, दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बॉक्समधील रक्कम रस्त्यावर पडल्याचा पाहताच स्थानिकांनी तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. विजयवाडा येथून हे वाहन विशाखापट्टणमकडे जात असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातात छोटा हत्ती वाहनातील चालक जखमी झाला असून त्यास गोपालपूरम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Rs 7 Crores cash, kept in seven boxes, seized in East Godavari district.
— ANI (@ANI) May 11, 2024
A vehicle had overturned after being hit by a lorry at Anantapally in Nallajarla Mandal. Locals noticed that 7 cardboard boxes, containing cash, were being transferred in that… pic.twitter.com/KbQmb5M175
एनटीआर जिल्ह्यातही 8 कोटी जप्त
दरम्यान, शुक्रवारीही आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात 8 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. पोलिसांनी नाकाबंदी तपासात पाईपने भरलेल्या ट्रकमधून नेण्यात येणारी ही रक्कम जप्त केली. पोलिसांनी ट्रकसह, रोकड जप्त करत दोघांना ताब्यातही घेतलं आहे.
25 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान
दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे, निवडणूक अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत आहेत. अराकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टनम, अनकापल्ली, काकिनाड़ा, अमलापुरम, राजमुंदरी, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टनम, विजयवाड़ा, गुंटूर, नरसारावपेट, बापटला, ओंगोल, नांदयाल, कर्नूलु, अनंतपुर, हिंदूपुर, कडपा, नेल्लोर, तिरुपति (आरक्षित), राजमपेट आणि चित्तूर मतदारसंघात मतदान होणार आहे.