Amravati News: मूलबाळ करुन देतो सांगत नदीकाठी नेऊन भोंदूबाबाचा महिलेवर अतिप्रसंग, अमरावती पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Amravati Bhondubaba Rape Case: अमरावतीतील भोंदू बाबावर बलात्कार, जादूटोणा आणि अॅस्ट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Amravati News: मूलबाळ करुन देतो सांगत नदीकाठी नेऊन भोंदूबाबाचा महिलेवर अतिप्रसंग, अमरावती पोलिसांनी ठोकल्या बेड्या amravati bhondubaba case police arrested santosh bawane daryapur kokarde bhondubaba latest news Amravati News: मूलबाळ करुन देतो सांगत नदीकाठी नेऊन भोंदूबाबाचा महिलेवर अतिप्रसंग, अमरावती पोलिसांनी ठोकल्या बेड्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/657565eba6c8bca7e1358a7f5f7438d9168472623299277_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amravati Bhondubaba Rape Case : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका भोंदूबाबा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूलबाळ करून देत असल्याचे सांगत या भोंदू बाबाने एका महिलेवर नदीकाठी बलात्कार केल्याचा आरोप आहे. फरार झालेल्या या ढोंगी बाबाला दर्यापूरच्या कोकर्डा येथून पोलिसांनी अटक केली. संतोष बावणे असं या भोंदूबाबांचं नाव आहे.
आपल्या घरी पाळणा हलावा, मूलबाळ व्हावे यासाठी अनेक जोडपी दर पौर्णिमेला या भोंदूबाबाच्या घरी मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. त्याचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. आता या बाबाला बलात्काराच्या आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष गजानन बावने (वय 30, रा. कुकसा, तालुका दर्यापूर) असं अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू, ठाणेदार संतोष ताले आणि अमरावती येथील पथकाने गुरुवारी कुकसा गावात जाऊन घटनास्थळी भेट दिली. पथकातील अधिकाऱ्यांनी घटनेच्या अनुषंगाने सखोल पाहणी करुन काही जणांशी बातचीतही केली. या घटनेने दर्यापूर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मे 2018 मध्ये लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यास मूलबाळ होत नव्हते. दरम्यान दवाखान्यात उपचार करुनही मूलबाळ झालं नाही. त्यानंतर एका नातेवाईक महिलेने दर्यापूर तालुक्यातील कुकसा येथील बावने महाराज यांच्याविषयी माहिती दिली. तुम्ही त्यांच्याकडे एकदा जा, तुम्हाला फायदा होईल असे तिने सांगितले. त्यानंतर घटनेतील पीडित महिला तिच्या पती आणि आईसह पहिल्यांदा पौर्णीमेला कुकसा येथे गेली.
त्या दिवशी बाबाने अंगात सवारी आणली. त्यानंतर या भोंदूबाबाने पुढील महिन्यातील पौर्णीमेला येण्यास सांगितले. पुढे तिसऱ्यांदा 10 एप्रिलला घटनेतील दाम्पत्य कुकसा येथे गेले असता बाबांनी 'माझ्या अंगात देव येतो, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की मूलबाळ होईल. करणी केल्यामुळे मुलबाळ होत नाही' अशा थापा मारल्या. पूजा-अर्चा करण्यासाठी 10 हजाराची मागणी केली. ती रक्कम पीडित महिलेच्या पतीने फोन पेद्वारे दिली होती. त्यानंतर पूजेचा खर्च म्हणून या दाम्पत्याने भोंदूबाबांना 40 हजार रुपये दिले. यावेळी पूजेची तारीख बुधवार 7 जून ही ठरवण्यात आली.
बाबाच्या आदेशानुसार हे दाम्पत्य दुचाकीने कुकसा येथे त्याच्या घरी पोहचले. दुपारी 1 वाजता भोंदूबाबाने गावाबाहेरील पूर्णा नदी काठी दाम्पत्यास पुजेसाठी नेले. बाबाने पूजा मांडून 20 हजार मागितले असता पीडित महिलेच्या पतीने तेही दिले. दरम्यान, पूजा सुरु असताना भोंदू बाबाने महिलेच्या पतीला पुजेकरीता गावातून मोहरी आणण्यास पाठवले. हीच संधी साधत भोंदूबाबाने त्या महिलेवर अतिप्रसंग केला.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भोंदू बाबावर बलात्कार, अॅट्रासिटी आणि अघोरी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन बाबाला अटक करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)