Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा तो ग्लास ताब्यात घेतला का?; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले महत्वाचे निर्देश
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली. अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप या याचिकेमधून करण्यात आला. यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
तक्रारदार, याचिकाकर्ता आणि त्यांच्या वकिलांना सुरक्षा पुरवण्याबाबत राज्य सरकारला योग्य तो निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यातआले आहे. अक्षय शिंदेने (Akshay Shinde) झटापटीत पोलिसांवर चालवलेल्या गोळ्या गाडीच्या आरपार बाहेर गेल्याची माहिती सरकारने न्यायालयात दिली. त्यामुळे या गोळ्या मिळवण्याचा प्रयत्न केलात का?, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
अक्षय शिंदेचा तो ग्लास ताब्यात घेतला का?
अक्षय शिंदेने पोलिसांच्या गाडीत पाणी पिण्यासाठी वापरलेला ग्लास ताब्यात घेतलात का?, आरोपीनं घटनेपूर्वी पाणी प्यायलं असेल तर त्यावर त्याच्या हाताचे ठसे असायला हवेत, असं न्यायालयाने सांगितले. तसेच अक्षयने ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्याच्या रिकामी पुंगळ्या न्यायवैद्यक शाळेत पाठवल्यात का?, जो पोलीस गाडीत जखमी झालाय, त्याच्या जखमेची शास्त्रोक्त तपासणी केलीत का?, असे राज्य सरकारला महत्त्वाचे सवाल न्यायालयाकडून विचारण्यात आले. निलेश मोरे या जखमी पोलिसाला लागलेली गोळी नेमकी कोणत्या बंदूकीतून झाडली होती?, तसेच त्याच्या जखमेबाबतही न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही सादर करण्याचे न्यायालयाकडून निर्देश जारी करण्यात आले आहे.
न्यायालयाकडून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांच्या वकिलांची कानउघडणी-
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कुठे थांबायला हवं याचंही भान राखायला हवं. तुम्ही तुमच्या याचिकाकर्त्यांवर अन्याय तर करत नाही ना, याचंही भान राखा. प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना थोडं भान बाळगा, असं म्हणत न्यायालयाकडून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांच्या वकील अमित कटारनवरे यांची कानउघडणी केली.
शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या-
बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर आज एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. बदलापुरातील नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिनाभरापासून पसार झाले होते. या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र 10 सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.