Akshay Shinde Encounter: आमच्याकडे घर नाही, आता रोज रेल्वे स्टेशनवर कचऱ्यात झोपतोय; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर आई-वडिलांनी टाहो फोडला
Badlapur sexual assault case: अक्षय शिंदे याला सोमवारी संध्याकाळी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले. एन्काऊंटरच्या काही तास आधी अक्षयचे आई-वडील त्याला जेलमध्ये भेटले होते.
![Akshay Shinde Encounter: आमच्याकडे घर नाही, आता रोज रेल्वे स्टेशनवर कचऱ्यात झोपतोय; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर आई-वडिलांनी टाहो फोडला Akshay Shinde died police Encounter parents said we sleep at railway station Akshay Shinde Encounter: आमच्याकडे घर नाही, आता रोज रेल्वे स्टेशनवर कचऱ्यात झोपतोय; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर आई-वडिलांनी टाहो फोडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/24/215efd10713a6dbd8b9bb702e68ca53a1727170194714954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. बदलापूरच्या शाळेच्या संस्थेतील काही लोकांना वाचवण्यासाठी आमच्या मुलाचा बळी देण्यात आला, असा आरोप अक्षय शिंदेच्या पालकांनी केली.
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर सोमवारी रात्रीपासून त्याचे पालक आणि नातेवाईक कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. आम्हाला आमच्या मुलाला बघू द्या, अशी विनवणी अक्षयचे पालक करत होते. मात्र, अक्षयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्याशिवाय तुम्हाला मृतदेह पाहता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे रात्रभर अक्षयचे पालक आणि नातेवाईक कळवा रुग्णालयाच्या परिसरात होते. यावेळी अक्षयच्या कुटुंबीयांना, सध्या तुम्ही कुठे राहत आहात, असा प्रश्न विचारण्यात आला. अक्षयच्या कुटुंबीयांना गावकऱ्यांनी गावातून हुसकावून लावले होते. तेव्हापासून अक्षयचे कुटुंबीय गायब होते. तुम्ही सध्या कुठे राहायला आहात, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर अक्षयच्या आई-वडिलांनी आम्ही रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे सांगितले.
आम्ही सध्या रेल्वे स्टेशनवर झोपतोय. आम्ही रोज स्टेशनवरच्या कुठल्या कोपऱ्यात कचऱ्यामध्ये झोपतोय, हे आम्ही तुम्हाला दाखवतो. तिकडेही पोलीस आम्हाला मारतात. अक्षयला पोलिसांनी पकडले तेव्हापासून आम्ही स्टेशनवर राहत आहोत, मीडियासमोर आलेलो नाही. आता याप्रकरणातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय, आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. मग पोलिसांनी आम्हाला गोळ्या घालून मारलं तरी चालेल, असा पवित्रा अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी घेतला आहे.
अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना गावकऱ्यांनी हुसकावलं
बदलापूरमधील शाळेत चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल दोन ते तीन दिवसांन याप्रकरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली होती. तपास सुरु झाल्यानंतर अक्षय शिंदे याला पोलिसांनी शाळेत सफाईचे काम करत असताना ताब्यात घेतले होते. यानंतर अक्षय शिंदे राहत असलेल्या बदलापूरमधील खरवई या गावातील ग्रामस्थांनी शिंदे यांच्या घराची तोडफोड केली होती. गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हुसकावून लावत गाव सोडण्यास भाग पाडले होते.
आणखी वाचा
अक्षय शिंदेच्या बॉडीचा एक्स-रे काढणार, जे.जे. रुग्णालयातील तीन डॉक्टरांचं पॅनल पोस्टमार्टेम करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)