सुनेला सासरी न पाठवल्याचा राग! सासऱ्याकडून व्याह्याला कडकडून चावा, अकोल्यातील घटना
Akola News : सुनेला सासरी नांदवायला पाठवत नसल्यामुळे सासर्याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेतला. यात मुलीचे वडील जखमी झाले आहेत.
Akola News : अकोला : कौटुंबिक कलह... अलिकडच्या काळातील परवलीचा शब्द... कौटुंबिक कलहातून झालेली भांडणंही अगदी नित्याचीच. मात्र, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुजरूक गावात मात्र कौटुंबिक कलहात 'कावा' साधत व्याह्यानंच व्याह्याचं चावा घेतल्याची काहीशी 'अजब' घटना घडली आहे. सुनेला सासरी नांदवायला पाठवत नसल्यामुळे सासर्याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेतला. यात मुलीचे वडील जखमी झालेत. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावई आणि त्याच्या वडिलांविरूद्ध हिवरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही कुटूंब उच्चशिक्षित आहेत.
कशी घडली घटना? :
वसंता महादेव राऊत हे अकोला जिल्ह्यातील अडगाव बुजरूक येथील देवीपुरा भागात राहतात. त्यांच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील पाथर्डा येथील राहुल रमेश इंगळे सोबत विवाह झाला होता. मात्र, घरगुती वाद झाल्याने मुलगी आठ महिन्यांपासून माहेरी राहत होती. या आठवड्यातील एका घटनेमुळे मात्र या वादाचा कडेलोट झाला. 'त्या' दिवशी दुपारी एक वाजता जावई राहुल आणि त्याचे वडील रमेश अडगाव येथे आलेत. "तुमच्या मुलीला आम्ही घ्यायला आलो आहोत. तिला नांदायला पाठवा, नाहीतर फारकत द्या", असे म्हणून दोघांनी वसंता यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण मारण्याची धमकी दिली. शब्दाशब्दाने वाद पार वाढत गेला. अन् याचवेळी त्यांच्यात आपसात मारहाण सुरू झाली. यातच मुलाचे वडील रमेश यांनी व्याही असलेले मुलीचे वडील वसंत राऊत यांच्या डाव्या हाताच्या पंजावर चावा घेतला. मारहाण आणि चावा घेतल्याने वसंता जखमी झाले होते.
हिवरखेड पोलिसांनी दाखल केलेत गुन्हे :
या भांडणांनंतर वसंता राऊत यांनी अडगाव पोलीस चौकीत यासंदर्भात तक्रार केली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत त्यांचा जावई राहुल रमेश इंगळे आणि व्याही रमेश इंगळे यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 324 नुसार हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha