ABP Majha Impact: पहिले लग्न झाल्यावर दुसरे लग्न करणे कायद्याने गुन्हा, 'माझा'च्या बातमीची राज्य महिला आयोगाने घेतली दखल
Dombivli Crime : माझाच्या बतमीनतर मानपाडा पोलिसांनी महिला अत्याचार प्रकरणात दोन कलम वाढवले आहेत.
डोंबिवली: पहिली पत्नी असताना पतीने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला होता. या घटनेचे 'माझा'ने सविस्तर वृत्त दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने बातमीची दखल घेत पोलिसांना सदर घटनेप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्यात पती महेश पाटील यांच्याविरोधात महिला अत्याचार कायद्यातर्गत पीडित पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप पीडित महिलेने पोलिसांवर केला आहे. आरोपी महेश हा डोंबिवली - खिडकाळी भागात राहतो. त्याची 28 वर्षीय पीडित तरुणीशी तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीतील एका मंदिरात ओळख झाली होती. ओळखीतून काही महिन्यात दोघात प्रेमसंबंध निर्माण होऊन दोघांनी सहमतीने हिंदू धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे 6 मार्च 2020 रोजी विवाह केला. त्यानंतर दोघे पती-पत्नी म्हणून कल्याण - शीळ मार्गवरील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहत होते. त्यातच गेल्या एक ते दीड वर्षापासून आरोपी पती महेशला दुसरा विवाह करण्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. मात्र पती असल्याने पीडित पत्नी त्याचे अत्याचार सहन करीत होती.
गेल्या काही महिन्यापासून पीडित पत्नीचा अधिक छळ करून 10 मार्च 2022 रोजी स्वतःच्या बेडरूममध्ये मोबईल कॅमेऱ्यातून गुपचूपपणे आरोपी पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर पीडित पत्नीला लोखंडी सळीने मारहाण करत धमकी देत तो तिचा अश्लील व्हिडिओ आरोपी पतीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंडवरून व्हायरल केला. पीडित पत्नीने व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी पतीला जाब विचारला असता, उलट तिलाच शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.
त्यानंतर दोन दिवसांनी पीडित पत्नीच्या मोबाईल मधील काही फोटो आणि व्हिडीओ आरोपी पतीने डिलीट करत तिला सांगितले की, मी दुसरे लग्न करणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच भिवंडी तालुक्यात राहणाऱ्या एका तरुणीशी आरोपी पतीचा गुपचूप सारखपुडा केल्याचे पीडित पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले. शिवाय येत्या 29 एप्रिल 2023 रोजी तो दुसरा विवाह साखरपुडा झालेल्या तरुणीशी करणार असल्याचे पीडित पत्नीला समजताच, तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी तिची तक्रार घेतली नसल्याने पीडित पत्नीने पोलीस उपआयुक्त यांच्याकडे लेखी तक्रर अर्ज दाखल केला.
त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात त्या अर्जानुसार 8 एप्रिल 2023 रोजी गुन्हा दाखल केल्याचे पीडित पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र एबीपी माझ्याच्या बातमीनंतर मानपाडा पोलिसांनी आरोपी पतीवर महिला अत्याचार अधिनियमामधील दोन गंभीर कलमे वाढवले आहे. तरी देखील आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला. सदर प्रकरणात पतीचे पाहिले लग्न झाल्यावर पतीने दुसरे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. यावर पोलिसांनी तातडीने हालचाली करून सदरच्या गंभीर विषयी पीडित पत्नीला न्याय मिळवून दिला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पतीचा दुसऱ्या लग्नाचा साखरपुडा झालाय तर 29 एप्रिलला विवाह सोहळा संपन्न होणार आहे.