Railway News: धावत्या ट्रेनमधून शूज चोरीला गेले; दोन राज्यांच्या पोलिसांकडून तपास सुरू
Railway News: धावत्या ट्रेनमधून शूज चोरीला गेल्याची तक्रार एका प्रवाशाने केल्यानंतर दोन राज्यातील पोलिसांकडून आता तपास करण्यात येत आहे.
Railway News: धावत्या ट्रेनमधून मोबाइल, पाकीट चोरी होणे अशा घटना घडत असतात. एक्स्प्रेस ट्रेनमधून (Express Train) प्रवास करताना चोर आपला हिसका दाखवतात आणि बॅग किंवा इतर वस्तूदेखील चोरतात. धावत्या ट्रेनमधून एका प्रवाशाचे शूज चोरीला गेले. आता, या चोरीचा तपास करण्यासाठी दोन राज्यांचे पोलीस कामाला लागले आहेत. प्रवाशाने याची तक्रार रेल्वेच्या 'रेल मदद' अॅपवर (Rail Madad App) केली होती
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील मुझफ्फरपूर रेल्वे ठाण्यात एका प्रवाशाने एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरनुसार, या प्रवाशाचे धावत्या ट्रेनमधून शूज चोरीला नेण्यात आले. प्रवाशाने याची तक्रार रेल्वेच्या 'रेल मदद' अॅपवर केली होती. प्रवासा दरम्यान या प्रवाशाने मुरादाबाद रेल्वे स्थानकात आपल्या बर्थ खाली शूज शोधले, मात्र त्याला आढळले नाहीत. सीतामढी येथील राहुल कुमार झा हे जयनगर क्लोन स्पेशल ट्रेन 04652 मधील बोगी क्रमांक बी-4 च्या 51 क्रमांकाच्या आसनावरून अंबाला स्थानकापासून प्रवास करत होते. या दरम्यान त्यांचे शूज चोरीला गेले. त्यांनी या तक्रार 'रेल मदद' अॅपवर तक्रार नोंदवली. मुझफ्फरपूर रेल्वे पोलिसांचा संदर्भ देत मुरादाबादमध्ये याची तक्रार नोंदवण्यात आली. आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राहुल कुमार झा यांचे शूज चोरीला गेले. त्याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली आहे. चोरीला गेलेले शूज आणि चोरांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे प्रवासी राहुल कुमार झा यांनी सांगितले की, मुझफ्फरपूरला येण्यासाठी 28 ऑक्टोबर रोजी स्पेशल ट्रेनमधून प्रवास करत होतो. उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे ट्रेन पोहचल्यानंतर झोपेतून जागा झाला. त्यावेळी बर्थ खाली ठेवलेले शूज गायब असल्याचे दिसून आले. आता, प्रवाशाचे चोरीला गेलेले शूज आणि चोराला शोधण्यासाठी आता पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
रेल मदद अॅप आहे तरी काय?
भारतीय रेल्वेचे Rail Madad अॅप अतिशय उपयुक्त आहे. तुम्हाला रेल्वेबाबत काही समस्या असल्यास आणि त्याबाबत तक्रार करावयाची असल्यास, परंतु वेळेच्या अभावी तुम्ही अशक्य असल्यास, अशा परिस्थितीत Rail Madad अॅप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या अॅपद्वारे तुम्ही ट्रेन किंवा रेल्वे स्टेशनशी संबंधित तक्रार त्वरित नोंदवू शकता.
या अॅपवर तुम्ही वैद्यकीय मदत, सुरक्षितता, दिव्यांगांसाठी सुविधा, कोचमधील स्वच्छता, कर्मचाऱ्यांची वागणूक इत्यादींसह अनेक मुद्द्यांवर तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रार केल्यानंतर तुम्ही तुमची तक्रार ट्रॅक करू शकता.