Crime News: एका 'नो बॉल'मुळे आयुष्य संपलं; खेळाडूला जबर मारहाण, दुर्दैवी अंत
Crime News: दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान वाद झाला. तिघांनी मिळून एका तरुणाला दगडानं बेदम मारहाण केली. ही घटना बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत सुमित नाल्यात पडल्यानंतरही आरोपींनी त्याला मारहाण सुरूच ठेवल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Clash During Cricket Match Near Noida: नवी दिल्ली : क्रिकेट सामना (Cricket Match) सुरू होता, तेवढ्यात खेळता खेळता वाद झाला. वादाचं रुपांतर भांडणात झालं आणि पुढे जे झालं ते खरंच फार भयावह होतं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामध्ये (Noida) क्रिकेट खेळताना झालेल्या वादामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान वाद झाला आणि याच वादातून तिघांनी एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा एक्स्टेंशनमध्ये रविवारी क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर तिघांनी एका 24 वर्षीय तरुणावर दगडानं हल्ला केला, यामध्ये तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान, या सामन्यात नो बॉलवरुन दोन संघांमध्ये झुंपली आणि क्षुल्लक कारणावरुन सुरू झालेल्या या भांडणाचा शेवट एकाच्या मृत्यूनं झाला.
यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादानंतर तिघांनी एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, नोएडा एक्स्टेंशनमध्ये रविवारी क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर तिघांनी एका 24 वर्षीय तरुणावर दगडानं हल्ला केला आणि याच हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या सामन्यात नो बॉलवरून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यातील नो बॉलवरुन तिघांनी सुमितला घेरलं आणि वाद सुरू झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर तिघांनी सुमितवर दगडानं वार करण्यास सुरुवात केली. तिघांच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न मृत सुमितनं केला. त्याच प्रयत्नात सुमितचा पाय घसरला आणि तो नाल्यात पडला. मात्र, तरिही आरोपींनी त्याच्यावर हल्ला सुरूच ठेवला. पुढे माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, पोलिसांना मृत तरुणाच्या कुटुंबियांकडून तक्रार मिळाली. सर्व आरोपी मेरठचे रहिवाशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला असून तिघांचा शोध सुरू आहे.
पोलीस उपायुक्त हिरदेश कथेरिया यांनी सांगितलं की, "बिसरख पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दुपारी चिपियाना गावाजवळ क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या भांडणाची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, सुमितनं हल्लेखोरांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो नाल्यात पडला आणि तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. तसेच, त्याच्या डोक्यावर दगड मारला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला."
मृत तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अधिकारी म्हणाले की, मुख्य आरोपी हिमांशू आणि इतर दोघांविरुद्ध बिसरख पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत झुंपली आणि संताप अनावर झालेल्या तिघांनी सुमितची दगडानं ठेचून हत्या केली.