Chandubhai Virani : दहावी पास, पोस्टर्स लावून पोट भरलं, आता 4 हजार कोटींच्या उद्योगाचे मालक ; चंदुभाई विरानी कोण आहेत?
चंदुभाई विरानी हे इयत्ता दहावीपर्यंतच शिकू शकले. मात्र मेहनतीच्या जोरावर त्यांनी आता तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं साम्राज्य उभारलं आहे.
पुणे : जगण्याच्या यात्रेत कितीही संघर्ष करावा लागला तरी न थकता परिश्रम केल्यास यश हमखास मिळतेच. छोट्या-छोट्या अडचणींचे भांडवल न करता धिराने काम करत राहिले तर यशाची गोड फळे चाखायला मिळतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यांनी बिकट काळाला तोंड देत आपलं कित्येक कोटी रुपयांचं साम्राज्य उभं केलेलं आहे. आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांचा सुरुवातीचा काळ कठीण होता, पण आता ते हजारो कोटी रुपयांचे मालक आहेत. यामध्ये प्राधान्याने नाव येते ते चंदुभाई विरानी (Who is Chandubhai Virani) यांचे. त्यांनी केलेला संघर्ष, घेतलेली मेहनत अनेकांना स्फूर्ती देणारी आहे.
कंपनीचे बाजारमूल्य तब्बल 4 हजार कोटी
चंदुभाई विरानी हे नाव अनेकांना माहिती नसेल. पण त्यांची कंपनी जे उत्पादन घेते, त्याची मात्र तुम्हाला नक्की कल्पना असेल. तुम्ही आतापर्यंत एकदातरी बालाजी कंपनीचे वेफर्स खाल्ले असतील. ही कंपनी चंदुभाई विरानी (Chandubhai Virani Success Story) यांनीच उभारलेली आहे. आज या कंपनीचे बाजारमूल्य तब्बल 4 हजार कोटी रुपये आहे. म्हणजेच शून्यातून सुरुवात करणारे चंदुभाई हे आज 4 हजार कोटी रुपयांचे मालक आहेत. त्यांनी 1992 साली बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने ही कंपनी चालू केली होती. याच कंपनीच्या माध्यमातून वेफर्स आणि अन्य खाद्यपदर्थांची निर्मिती केली जाते. एवढं सारं यश त्यांना काही एका दिवसात मिळालेलं नाही.
वडिलांनी दिले होते 20 हजार रुपये
चंदुभाई यांचा जन्म 31 जानेवारी 1957 रोजी गुजरातच्या जामनगरमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. चंदुभाई 15 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंबीय चरितार्थाच्या शोधात धुंडोराजी येथे पोहोचले. परिस्थितीमुळे चंदुभाई फक्त इयत्ता दहावीपर्यंतच शिकू शकले. या काळात वडिलांच्या बचतीवरच त्यांचे कुटुंब चालत असते. चंदुभाई आणि त्यांच्या भावाने शेतविषयक उपकरणं आणि वेगवेगळ्या उत्पादनांची विक्री करण्याचा व्यवसाय चालू केला. त्यासाठी चंदुभाईंच्या वडिलांनी त्यांना २० हजार रुपये दिले होते. मात्र दुर्दैवाने दोन वर्षांच्या आत हा व्यवसाय तोट्यात गेला. यामुळे चंदुभाई यांचे कुटुंबीय जास्तच अडचणीत आले.
सिनेमांची पोस्टर्स लावण्याचे काम केले
व्यवसाय ठप्प पडल्यानंतर उदरर्निवाहासाठी चंदूभाई तसेच त्यांच्या भावाने अॅस्ट्रॉन सिनेमागृहाच्या उपहारगृहात काम करायला सुरुवात केली. सोबतच ते सिनेमागृहाचे फाटलेले शीट शिवणे, चित्रपटांचे पोस्टर्स लावणे अशी कामे करायचे. मात्र येथे काम करत असतानाच त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. अॅस्ट्रॉन सिनेमात काम करताना त्याच्या उपहारगृहात 1000 रुपये प्रतिमहिना या दराने त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्यानंतर चंदूभाई यांनी मागे वळून पाहिलं नाही.
पुन्हा एकदा उद्योग उभारण्याचा प्रयत्न
येथे काम करत असताना चंदूभाईंनी पुन्हा एकदा स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचं ठरवलं. सिनेमागृहाच्या उपहारगृहात काम करत असताना चिप्स आणि स्नॅक्सला फार मागणी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी चिप्स तयार करण्यास सुरुवात केली. चिप्स चविष्ट, रुचकर लागावेत यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करून पाहायचे. हा उद्योग उभारण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.
50 लाखांचे कर्ज काढले
या गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला चिप्स तयार केले. त्यांनी तयार केलेल्या चिप्सना अॅस्ट्रॉन सिनेमागृह तसेच आजूबाजूच्या परिसरात चांगलीच पसंदी मिळाली. बघता बघता त्यांचा हा व्यवसाय वाढला. पुढे चंदुभाई यांनी राजकोटमध्ये एक पोटॅटो वेफर्स तयार करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बँक तसेच इतर माध्यमातून 50 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. पुढे 1992 मध्ये चंदुभाई आणि त्यांच्या भावाने बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या कंपनीची स्थापना केली.
देशभरात एकूण 5 हजार कर्मचारी
सध्या त्यांच्या कंपनीत देशभरात एकूण 5 हजार कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे यातील 50 टक्के कर्मचारी या महिला आहेत. या कंपनीच्या वळसद आणि राजकोट येथील युनिट्सची प्रतितास 3400 किलो चिप्स निर्मितीची क्षमता आहे. गेल्या काही वर्षांत चंदुभाई यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यांचा संघर्ष, महेनत प्रेरणादायी आहे.