SIP करताय पण चौपट, पाचपट परतावा हवाय? मग 'या' सूत्राचा अवलंब करा अन् खोऱ्याने पैसे ओढा!
चांगल्या परताव्यासाठी एसआयपी हा चांगला पर्याय मानला जातो. नियोजनबद्ध पद्धतीने पैसे गुंतवल्यास तुम्हाला दीर्घकाळाच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
मुंबई : जोखीम न घेता गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी (SIP) हा एक चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही फंडात प्रतिमहिना गुंतवणूक करू शकता. यामुळे निश्चित काळासाठी ही गुंतवणूक चालू ठेवल्यास तुम्हाला चांगला फायदा होतो. एसआयपीमध्ये तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर साधारण 12 टक्क्यांनी परतावा मिळतो, असे मानले जाते. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो.
एसआयपीमध्ये जेवढा जास्त काळ गुंतवणूक कराल, तेवढाच अधिक परतावा तुम्हाला मिळतो. मात्र 'टॉप अप'चे सूत्र वापरल्यास (What is Top Up SIP) तुम्हाला मिळणारा हा परतावा आणखी वाढू शकतो. तुम्हाला परत मिळणारे पैसे हे दुप्प्ट, तिप्पट, चौपट होऊ शकतात.
Top-Up SIP नेमकं काय आहे?
सामान्यपणे एसआयपी चालू केल्यावर प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला तुम्ही ठरवलेली रक्कम तुमच्या फंडात जमा करता. समजा तुम्ही दहा वर्षांसाठी 2,000 रुपयांची SIP करण्याचं ठरवलं आहे. तुमची ही एसआयपी कितीही वर्षे झाली तरी प्रतिमहिना दोन हजार रुपयेच असते. मात्र Top-Up SIP मध्ये असं होत नाही. तुम्ही नियमितपणे जी रक्कम एसआयपीच्या माध्यमातून भरत आहात, त्यामध्ये आणखी काही अतिरिक्त रक्कम जोडणे, यालाच टॉप अप एसआयपी म्हटले जाते. उदाहरणासह सांगायचं झाल्यास तुम्ही प्रत्येक महिन्याला 2,000 रुपायांची एसआयपी करायचं ठरवलेलं आहे. यात प्रत्यके वर्षाला आणखी काही अतिरिक्त रक्कम टाकणे म्हणजेच Top-Up एसआयपी होय.
10 टक्क्यांची टॉप अप एसआयपी केल्यावर काय होणार?
समजा तुम्ही प्रतिमहिना दोन हजार रुपयांची एसआयपी करत असाल तर प्रत्येक वर्षाला या एसआयपीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ करायची. म्हणजेच पहिल्या वर्षी तुम्ही 2000 रुपयांची एसआयपी करत असाल तर दुसऱ्या वर्षी 2200 रुपयांची एसआयपी करायची. तिसऱ्या वर्षी या रकमेत दहा टक्क्यांनी वाढ करायची. म्हणजेच प्रत्येक वर्षाला तुम्ही करत असलेल्या एसआयपीत दहा टक्क्यांनी वाढ होईल. समजा तुम्ही एसआयपीमध्ये 10 टक्क्यांच्या टॉप अपने वाढ केल्यास आणि ही रक्कम सतत 15 वर्षे भरल्यास तुमचे एकूण 7,62,540 रुपये जमा होतील. त्यावर तुम्हाला 9,74,230 रुपयांचे व्याज मिळेल. पंधरा वर्षांत तुम्हाला एकूण 17,36,770 रुपये मिळतील.
25 वर्षे एसआयपी केल्यावर काय होणार?
हाच फॉर्म्यूला तुम्ही वीस वर्षे राबवल्यास तुमचे एकूण 13,74,600 रुपये जमा होतील. यावर तुम्हाला 12 टक्क्यांच्या हिशोबाने 26,03,143 रुपये व्याज मिळेल. वीस वर्षांनंतर तुम्हाला 39,77,743 रुपये मिळतील. हीच एसआयपी तुम्ही 25 वर्षांसाठी केली तर तुमचे एकूण 23,60,3295 रुपये जमा होतील. त्यावर तुम्हाला 61,90,763 रुपये व्याज मिळेल. 25 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 85,51,092 रुपए मिळतील.
(टीप- या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे. गुंतवणुकीचा सल्ला देण्याचा आमचा उद्देश नाही. प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क करा)