Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ने बजावलेल्या एका अलीकडील नोटीसीमुळे 'विमल वेलची' आणि 'विमल पान मसाला' पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Vimal Pan Masala Owner Net Worth: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वाखाली बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी (Vimal Pan Masala) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. FDAच्या मते, ‘विमल इलायची’च्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाचा अप्रत्यक्ष म्हणजेच सरोगेट जाहिरातीद्वारे प्रचार केला जात असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रात तंबाखू आणि निकोटिनयुक्त गुटखा व पानमसाल्यावर बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
विमल पान मसालाचा मालक कोण आहे आणि याची सुरुवात कधी झाली? (Vimal Pan Masala Owner Net Worth)
भारतीय बाजारपेठेत पान मसाला आणि वेलची (cardamom) ब्रँड्सचे वर्चस्व सर्वश्रुत आहे. मात्र, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या एका अलीकडील नोटीसीमुळे 'विमल वेलची' आणि 'विमल पान मसाला' पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. 'विमल पान मसाला' हा ब्रँड 'विमल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' अंतर्गत चालवला जातो. विमल कुमार अग्रवाल हे या नामांकित ब्रँडचे मालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी 1990 च्या दशकात या व्यावसायिक समूहाची पायाभरणी केली. या कंपनीचे मुख्यालय देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आहे. विमल कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा वेगाने विस्तार झाला आणि गुटखा, पान मसाला व वेलची या क्षेत्रांमध्ये तिने स्वतःचे एक प्रमुख स्थान निर्माण केले. सध्या हा समूह प्रामुख्याने 'विमल पान मसाला' आणि 'विमल वेलची' यांसारख्या लोकप्रिय उत्पादनांच्या विक्रीवर तसेच देशभरातील वितरण जाळे बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
कोट्यवधींची दैनंदिन विक्री आणि कोट्यवधींचे साम्राज्य- (Vimal Pan Masala Owner Net Worth)
कमाई आणि आर्थिक स्थितीवर नजर टाकल्यास 'विमल ग्रुप'ची प्रचंड आर्थिक ताकद दिसून येते. अहवालांनुसार, या समूहाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1900 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे अनुमान आहे. भारतातील पान मसाला आणि गुटखा उद्योगाची एकूण उलाढाल 42000 कोटी ते 46000 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे आणि यात 'विमल'चा बाजारपेठेतील वाटा लक्षणीय आहे. जरी कंपनीचे मालक विमल कुमार अग्रवाल यांची नेमकी वैयक्तिक संपत्ती सार्वजनिक माहिती नसली, तरी केवळ लहान पाकिटे आणि वेलची उत्पादनांच्या विक्रीतून हा ब्रँड दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतो.
भारतात किती लोक पान मसालाचे सेवन करतात? (Vimal Pan Masala)
'विमल' सारख्या पान मसाला ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये अनेकदा ऐषआरामी जीवनशैली, महागड्या गाड्या, पांढरे घोडे आणि आलिशान राहणीमान यांचे प्रदर्शन केले जाते. मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि आकडेवारीच्या दृष्टीने पाहता, यातील वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील 27 कोटींहून अधिक लोक तंबाखू किंवा पान मसाल्याचे सेवन करतात; तंबाखूच्या वापराबाबत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात तंबाखू आणि सिगारेटच्या सेवनामुळे दररोज सुमारे 3500 लोकांचा मृत्यू होतो.
तंबाखूचे सेवन आणि तोंडाचा कर्करोग यासंबंधीची आकडेवारी- (Vimal Pan Masala Marathi News)
'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे' (NFHS-5) च्या अहवालात भारतातील तंबाखू सेवनाबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या माहितीनुसार, ग्रामीण भागातील 43 टक्के आणि शहरी भागातील 29 टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात. तसेच, गावातील 11 टक्के आणि शहरातील 5 टक्के महिलाही याचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका सर्वेक्षणानुसार, भारतातील लोक सरासरी वयाच्या 17 व्या वर्षीच तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात करतात. या सवयीमुळे भारतात दरवर्षी सुमारे 10 लाख (एक दशलक्ष) लोकांचा तोंडाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो.
'विमल'च्या जाहिरात मोहिमेला यापूर्वीही करावा लागला कायदेशीर अडचणींचा सामना- (FDA Tukaram Mundhe Action On Pan Masala)
'विमल' ब्रँड आपल्या जाहिरातींमुळे वादात सापडणे ही काही नवीन बाब नाही. 2018 मध्ये, 'डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस'ने (DGHS) 'विष्णू पाउच पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड'ला नोटीस बजावली होती. त्यावेळी, कंपनीवर आपल्या इतर उत्पादनांच्या आडून अप्रत्यक्षपणे तंबाखूचा प्रचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, कंपनीने या कारवाईला आव्हान दिले आणि आपण देशांतर्गत बाजारासाठी तंबाखू उत्पादनांचे उत्पादन करत नाही, असे स्पष्ट केले. हा वाद न्यायालयात गेला आणि जानेवारी 2024 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने DGHS चे अपील फेटाळून लावले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या






















