Economic Survey 2021: देशाची आर्थिक स्थिती कशी आहे? आज संसदेत सादर होणार आर्थिक पाहणी अहवाल
Economic Survey Union Budget 2021: देशाची आर्थिक स्थिती काय आहे, कोणत्या क्षेत्राचा विकासाचा दर किती आहे हे आज समजणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत.
नवी दिल्ली: शुक्रवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2020-21 सालचा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करतील.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी एक दिवस आधी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो. त्यातून देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. मधल्या दोन दिवसाच्या सुट्ट्या लक्षात घेता या वर्षी आर्थिक पाहणी अहवाल हा शुक्रवारी 29 जानेवारीला सादर करण्यात येणार आहे.
या आर्थिक पाहणी अहवालाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेने गेल्या आर्थिक वर्षात कशा प्रकारची कामगिरी केली याचा अंदाज येतो. गेल्या आर्थिक वर्षात कशा प्रकारे खर्च करण्यात आला आणि कशा प्रकारे त्याचा परिणाम साध्य झाला हे त्यामाध्यमातून देशासमोर मांडण्यात येतं. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीला दिशाही मिळते.
Budget 2021 | अर्थसंकल्पाच्या आधी येणारा आर्थिक पाहणी अहवाल का असतो महत्वाचा? जाणून घ्या सविस्तर...
देशाचा आर्थिक पाहणी अहवाल हा सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारामार्फत तयार करण्यात येतो. त्या संबंधी आर्थिक तज्ज्ञांची एक टीम त्यावर काम करत असते. या वर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल हा मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्याकडून तयार करण्यात येत आहे.
आर्थिक पाहणी अहवालाच्या मदतीने येत्या आर्थिक वर्षातल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेचे विश्लेषण करण्यात येते. या माध्यमातून सरकार कोणत्या क्षेत्रावर जास्त भर देत आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे किंवा सरकारच्या खर्चाची दिशा काय आहे या प्रश्नांची उत्तरे मिळतात.
देशाची अर्थव्यवस्थेची गती काय आहे, विकासामध्ये कोणत्या क्षेत्राने बाजी मारलीय, कोणत्या क्षेत्राने जास्त गुंतवणूक आकर्षित केली किंवा कोणत्या क्षेत्राची कामगिरी सुमार झाली या प्रश्नांचीही उत्तरे आर्थिक पाहणी अहवालातून मिळतात.
Union Budget 2021: किती आहेत अर्थसंकल्पाचे प्रकार? त्या बद्दल सर्वकाही...