Unemployment In India: देशात 25 वर्षांखालील 42 टक्के तरुण बेरोजगार; अहवालातून भीषण वास्तव समोर
Unemployment In India: अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023 च्या अहवालातून भीषण वास्तव समोर आलं आहे. अहवालानुसार, देशात 42 टक्के पदवीधर बेरोजगार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Unemployment In India: देशातील लोकांची बचत 50 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे आणि लोकांवर कर्जाचा बोजा वाढत आहे, असा अहवाल सर्वात आधी आरबीआयच्या (Reserve Bank of India) वतीनं जाहीर करण्यात आला. आता देशातील बेरोजगारीबाबत (Unemployment) एक अहवाल समोर आला आहे, जो अत्यंत चिंताजनक आहे.
अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या वतीन जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशातील 25 वर्षांखालील तरुण पदवीधरांपैकी 42.3 टक्के बेरोजगार आहेत. देशातील बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) 2019-20 मध्ये 8.8 टक्के होता, जो 2020-21 मध्ये 7.5 टक्के आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 6.6 टक्क्यांवर आला आहे. अहवालानुसार, देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे.
अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या (Azim Premji University) स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023 च्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, सर्वाधिक 22.8 टक्के बेरोजगारी दर 25 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेतलेल्या 25 वर्षांखालील तरुणांमधील बेरोजगारीचा दर 21.4 टक्के आहे, जो सर्वाधिक आहे. 35 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पदवीधर लोकांमध्ये बेरोजगारीचा दर केवळ 1.6 टक्के आहे.
अहवालानुसार, 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरक्षर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 13.5 टक्के असल्याचं आढळून आलं आहे. तर 40 वर्ष आणि त्यावरील निरक्षर गटातील बेरोजगारीचा दर 2.4 टक्के आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाचा हा अहवाल सरकारी आकडेवारीवर आधारित आहे. एनएसओचे रोजगार-बेरोजगार सर्वेक्षण, श्रमिक कार्यबल सर्वेक्षण, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण, लोकसंख्या जनगणना यासारख्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. इंडिया वर्किंग सर्व्हे नावाचं विशेष सर्वेक्षण कर्नाटक आणि राजस्थानच्या ग्रामीण भागातही करण्यात आलं आहे.
अहवालात म्हटलं आहे की, देशातील बेरोजगारीचा दर कमी झाला असला तरी उत्पन्नाची पातळी स्थिर राहिली आहे. अहवालानुसार, कोरोना महामारीचा तडाखा बसण्यापूर्वीच महिलांच्या उत्पन्नात घट होऊ लागली होती. 2004 पासून, महिला रोजगार दर एकतर घसरत आहे किंवा स्थिर आहे. 2019 पासून महिलांच्या रोजगारात वाढ झाली आहे. महामारीच्या काळात मोठ्या संख्येनं महिलांनी स्वयंरोजगाराचा अवलंब केला आहे. कोरोना महामारीपूर्वी 50 टक्के स्त्रिया स्वयंरोजगार करत होत्या आणि महामारीनंतर हा आकडा 60 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :