Mega Bonus: कंपनीचा नाद खुळा! कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून देणार 50 महिन्यांचा पगार
Bonus: शिपिंग कंपनीने आपल्या निवडक कर्मचाऱ्यांना तब्बल 50 महिन्यांचा पगार बोनस म्हणून जाहीर केला आहे. कंपनीच्या महसूल, नफ्यात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Bonus: एका कंपनीच्या भरभराटीत व्यवस्थापनसह कर्मचारी-कामगारांचाही मोठा वाटा असतो. कंपनीकडून कर्मचारी-कामगारांना नफ्यातील काही भाग बोनस (Bonus) म्हणून देतात. मात्र, एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांचा पगार हा बोनस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या काही निवडक कर्मचाऱ्यांना हा भन्नाट बोनस जाहीर (Mega Bonus) केला आहे. कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तैवानमधील एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशन (Evergreen Marine Corporation) या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, यंदाचे वर्ष 2023 तैवानच्या एव्हरग्रीन मरीन कॉर्पच्या कर्मचार्यांसाठी जबरदस्त ठरणार आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 50 महिन्यांचा पगार एकाच वेळी जमा करणार आहे. एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला आहे. हा बोनस तैवानमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच देण्यात येणार आहे. Evergreen Marine Corporation ही कंपनी तैपईमधील आहे.
कंपनीने काय म्हटले?
Evergreen Marine Corporation कंपनीने म्हटले की, वर्षाच्या अखेरीस कंपनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारीत बोनस देते. मागील दोन वर्षात शिपिंग सेक्टरमध्ये मोठी भरभराट दिसून आली. त्याच्या परिणामी कंपनीला चांगला नफा मिळाला. कंपनीचा 2022 मध्ये महसूल हा 634.6 अब्ज डॉलरच्या घरात होता. हा आकडा 2020 पेक्षा तीन पट अधिक आहे.
वार्षिक महसुलात वाढ
मागील काही वर्षात कंपनीला शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कंपनीच्या शेअर दरात वर्ष 2021 मध्ये 250 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, मागील वर्षी कंपनीच्या शेअरमध्ये 54 टक्क्यांची घसरण दिसून आली.
सुएझ कालव्यात अडकली होते कंपनीचे जहाज
2021 वर्षाच्या सुरुवातीला Evergreen Marine Corporation ची जगभरात मोठी चर्चा झाली होती. या कंपनीचे मालवाहतूक करणारे जहाज सुएझ कालव्यात अडकले होते. त्यामुळे सुएझ कालव्या मार्फत होणारी वाहतूक ठप्प झाली होती. याच्या परिणामी जगभरातील मागणी-पुरवठा साखळी काही प्रमाणात विस्कळीत झाली होती.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
Evergreen Marine Corporation कंपनीकडून तैवानमधील कर्मचाऱ्यांना 50 महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्यानंतर इतर ठिकाणच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शांघाईमधील कर्मचाऱ्यांनी असा भेदभाव करणे चुकीचे असल्याचे सागंत नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीच्या यशात आमचाही वाटा असून आम्हालाही बोनस द्यावा, अशी मागमी कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे वृत्त आहे.