Share Market : शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; सलग दोन सत्रांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या 6.5 लाख कोटी रुपयांचा चुराडा
Stock Market Updates : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला.
मुंबई : आजचा दिवस शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे' ठरला.आज शेअर बाजारात सेन्सेक्स 872 अंकांनी घसरला, तर निफ्टीही 268 अंकांनी घसरला. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या 6.5 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड त्याच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 45.6 लाख कोटी रुपयांची भर पडली होती. आता 6.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. आजच्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील भांडवली मूल्य 280.52 लाख कोटींवरुन ते 274.02 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (foreign institutional investors FIIs) शेअर बाजारामध्ये सातत्याने खरेदी केली जात असतानाही गेल्या दोन दिवसात सेन्सेक्समध्ये जवळपास 1700 अंकांची घसरण झाली आहे. त्याचा फटका गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात बसला.
फेडच्या व्याजदर वाढीमुळे चिंता
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची 25 ते 27 ऑगस्ट या दरम्यान बैठक आहे. या बैठकीत पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. फेडकडून येत्या काळात व्याजदरात 75 अंकांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील महागाई दर दोन टक्क्यांवर आणण्यासाठी फेडकडून प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढीच्या बातम्यांमुळे यूएस डॉलरच्या इंडेक्समध्ये वाढ झाली असून तो 108.4 वर पोहोचला आहे.
शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 872 अंकांची घसरण झाली आहे तर निफ्टीमध्ये 267 अंकांची घसरण झाली. बीएसई मिडकॅपमध्ये 1.8 टक्क्यांची तर स्मॉलकॅपमध्ये 1.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 2.7 टक्क्यांची घसरण झाली आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- TATA Cons. Prod- 0.89 टक्के
- ITC- 0.77 टक्के
- Coal India- 0.53 टक्के
- Britannia- 0.38 टक्के
- Nestle- 0.06 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Tata Steel- 4.54 टक्के
- Asian Paints- 3.81 टक्के
- Adani Ports- 3.62 टक्के
- Tata Motors- 3.48 टक्के
- JSW Steel- 3.25 टक्के