शेअर बाजारात सुपर मंडे! Sensex एकाच दिवसात 3000 अंकांनी वधारला, Nifty 916 अंकांनी वाढला
Stock Market Update : शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार एकाच दिवसात मालामाल झाले असून त्यांनी लाखो कोटींची संपत्ती कमावल्याचं दिसून आलं.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफवरील चर्चेचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं. शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 3.74 टक्के तर निफ्टीमध्ये 3.82 टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 2,975 अंकांची वाढ होऊन तो 82,429 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 916 अंकांची वाढ होऊन तो 24,924 पोहोचला. सोमवारी शेअर बाजारातील 3,236 शेअर्समध्ये मोठी वाढ झाली तर 448 शेअर्समध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं.
Stock Market News Update : डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
भारतासाठी संरक्षण उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांचे आणि शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांना शस्त्रास्त्र उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), C2C अॅडव्हान्स (Aerospace & Defence Companies stock), लार्सन , मिश्रा धातू , आयडियाफोर्ज टेक या कंपन्यांचा समावेश आहे.
Share Market Today : परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे बाजारात तेजी आल्याचं सांगितलं जातंय. या तेजीमागे परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी हे एक प्रमुख कारण आहे. देशाच्या जीडीपी आणि उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा, चलनवाढ आणि व्याजदर यांसारख्या देशांतर्गत मॅक्रो निर्देशांकात घट ही बाजारातील गती पुनरुज्जीवित होण्याची चिन्हे आहेत.
Sensex Today : या शेअर्सच्या बाजूने परदेशी गुंतवणूकदार
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, आरआयएल, एल अँड टी, भारती, अल्ट्राटेक, एम अँड एम आणि आयशर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.























