Stock market: शेअर बाजारात ब्लडबाथ, सेनेक्स अन् निफ्टी गडगडले, ट्रम्प यांच्या निर्णयाने गुंतवणुकदार कंगाल
Stock Market Sensex Nifty: ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे शेअर बाजारात ब्लॅक मंडे, प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 3600 अंकांनी कोसळला. शेअर बाजारात ब्लॅक मंडे.

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतर देशांवर आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाचे जगभरात विपरीत पडसाद उमटत आहेत. त्यामुळेच सोमवारी आशियाई भांडवली बाजारापाठोपाठ भारतातील शेअर मार्केटमध्ये (Stock Market) प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली. प्री ओपनिंग सेशन आणि प्रत्यक्ष बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्समध्ये (Sensex) मोठी घसरण पाहायला मिळाली. भांडवली बाजाराचे व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स 2,743 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीही (Nifty) जवळपास 900 अंकांनी खाली घसरला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या (Ivestors) पैशांची राखरांगोळी झाली आहे. सेन्सेक्स तब्बल 3 हजार अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटींचं नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील हा ट्रेंड दिवसभर कायम राहिल्यास भारतीय गुंतवणुकदारांना खूप मोठे नुकसान सोसावे लागेल.
शेअर बाजरातील या पडझडीत आयटी कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. जवळपास सर्व आयटी कंपन्यांच्या समभागांची किंमत मोठ्याप्रमाणावर घसरली आहे. तर टाटा मोटर्सचे समभाग 9 टक्क्यांनी गडगडले आहेत. टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हरने (जेएलआर) एप्रिलसाठी अमेरिकेत वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली होती. ही टाटा मोटर्सची उपकंपनी असल्याने टाटा मोटर्सच्या समभागात घसरण पाहायला मिळत आहे.
आशियाई बाजारपेठेतही राखरांगोळी
भारतीय शेअर बाजारापूर्वी आशियाई शेअर बाजार सुरु झाले होते. त्यावेळी आशियाई देशांमध्येही ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणाचे नकारात्मक पडसाद उमटले. सोमवारी तैवानचा शेअर बाजार 9.8 टक्क्याने कोसळला आहे. तर जपान आणि हाँगकाँग येथील भांडवली बाजारातही लक्षणीय 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार 6.4 टक्क्यानं घसरला आहे. सिंगापूर शेअर बाजारात 5.5% तर मलेशियात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय, जागतिक बाजारपेठेत सोनं आणि कच्च्या तेलाचे भाव आणखी घसरले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या धोरणाकडे लक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात पडझड होत असल्याने आता सर्वांचे लक्ष रिझर्व्ह बँकेकडे लागले आहे. येत्या 9 तारखेला रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण घोषित होणार आहे. यावेळी रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करेल, अशी आशा अनेकांना आहे. याचा परिणाम गृह कर्ज आणि वाहन कर्जांच्या हप्त्यांवर होईल. त्यामुळे आता भारतीय रिझर्व्ह बँक सर्वसामान्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा

























