मसाल्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर? चार मसाल्यांची विक्री थांबवण्याचा आदेश!
आपण रोज अनेक मसाले खातो. पण हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एकूण चार मसाल्यांची विक्री थांबवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : वेगवेगळ्या मसल्याचे (Masala) पदार्थ आपण मोठ्या चवीने खातो. मात्र हेच मसाले आपल्यासाठी जीवघेणेदेखील ठरू शकतात. सध्या भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या काही उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण हाँगकाँग आणि सिंगापूरच्या सरकारने यातील एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्याची विक्री थांबवली आहे. तसेच तेथील नागरिकांसाठी या सरकारने काही सूचनादेखील जारी केल्या आहेत. हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
कॅन्सर होण्याचा धोका?
हाँगकाँग आणि सिंगापूर सरकारने भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री थांबवण्यात आली आहे. लोकांनी हे मसाले वापरू नयेत, असं येथील सरकारने म्हटलंय. तेथील खाद्य संरक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार या दोनपैकी एका कंपनीच्या तीन आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्यात इथिलीन ऑक्साइड नावाचा घटक प्रमाणापेक्षा अधिक आहे. या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साइड या घटकाला कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या "समूह 1 कार्सिनोजेन" यामध्ये वर्गीकृत केलेले आहे.
कोणकोणत्या मसाल्यांवर बंदी
वृत्तसंस्था आयएनएएसच्या वृत्तानुसार हाँगकाँगचे खाद्य सुरक्षा मंडळ सेंटर फॉर फूड सेफ्टीच्या (सीएफएस) म्हणण्यानुसार करी पावडर, सांबर मसाला आणि करी पावडर, मिक्स मसाला पावडर, फिश करी मसाले यांची विक्री थांबवण्यात आली आहे. या मसाल्यांत कीटनाशक, इथिलीन ऑक्साइड आढळले आहे.
तपासणीत झाला खुलासा
सेंटर फॉर फूड सेफ्टीनुसार त्यांनी या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मसाल्यांची नियमित चाचणी केली. त्यासाठी हाँगकाँगमधील तीन दुकानदारांकडून या मसाल्यांचे नमुने घेण्यात आले. याच नमुन्यांत कीटनाशक, इथिलीन ऑक्साइड असल्याचे आढळले. त्यानंतर सेंटर फॉर फूड सेफ्टीने विक्रेत्यांना या मसल्याची विक्री थांबवण्याचा आदेश दिला.
फिश करी मसाल्यावरही कारवाई
एकीकडे हाँकगाँगमध्ये तीन मसाल्यांवर कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे सिंगापूरमध्येही दुसऱ्या एका मसाल्याची विक्री थांबवण्याचा आदेश देण्यात आला. सिंगापूरच्या खाद्य सुरक्षा (एसएफए) प्राधिकरणाने या उत्पादनांत इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण निश्चित प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. एसएफएच्या म्हणण्यानुसार इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यावर शरीरावर प्रतिकूल परिणाम होत नाही. पण या घटकाचा समावेश असलेल्या पदार्थांचे बऱ्याच काळापासून सेवन केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा :
इराण-इस्रायल यांच्यातील तणावाचा भारताला फटका? निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार?
आधी होते LIC एजंट, आज अब्जाधीश, शून्यातून मोठं साम्राज्य उभं करणारे लक्ष्मण मित्तल कोण आहेत?
एकही रुपया न देता आधारकार्ड अपडेट करता येणार, नेमकं कसं? जाणून घ्या..