Share Market : शेअर बाजार हजार अंकांनी का घसरला? जाणून घ्या त्यामागची महत्त्वाची पाच कारणं...
Stock Market : राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने गेल्या 52 आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली आहे.

मुंबई: भारतीय शेअर बाजारामध्ये सलग पाच सत्रांमध्ये घसरण झाली असून आज सेन्सेक्स तब्बल 1,045 अंकांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारातील प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून येतोय. त्यामुळे निफ्टीनेही गेल्या 52 आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली आहे.
शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,062 अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हा 343 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये 2.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 51,479 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 2.19 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,571 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजार घसरण्यासाठी कारणीभूत घटक
अमेरिकेत फेडने व्याजदर वाढवले
अमेरिकेतील महागाईने गेल्या 40 वर्षातील महागाई दराचा तळ गाठला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे फेडरल बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून शेअर बाजार चांगलाच कोसळला.
परकीय गुंतवणुकदारांकडून गुंतवणूक मागे
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. परकीय गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसांमध्ये 31,000 कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यामध्ये 2.2 लाख कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत.
बँक ऑफ इंग्लंड व्याजदरात वाढ करण्याची शक्यता
अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेकडून आज व्याजदरात वाढ झाल्याने त्याचा दबाब आता बँक ऑफ इंग्लंडवर निर्माण झाला आहे. परिणामी इंग्लंडमधील महागाई दर नियंत्रित ठेवण्यासाठी आता बँक ऑफ इंग्लंड त्याच्या व्याजदरात वाढ करण्यात येण्याची शक्यता जास्त आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर पुरवठा साखळीमध्ये अडथळा निर्माण झाला असून त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही विक्रमी वाढ झाली आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत आज 45 सेंट्सची घसरण झाली असून ती 118.06 डॉलर्सवर स्थिरावली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून येतोय.
जागतिक परिस्थिती प्रतिकूल
अमेरिकेच्या फेडचा व्याजदर वाढवण्याचा निर्णय आणि जगभरातील वाढती महागाई याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं. जर्मनीचा शेअर बाजार म्हणजे डीएएक्समध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली आहे तर आशियन मार्केटमधील हाँगकाँगच्या मार्केटमध्येही दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या शेअर बाजारातही काही प्रमाणात घसरण झाली आहे.























