Share Market Opening : शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला
Share Market Opening : शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला आहे.
Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसून येत आहे. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये तेजी असल्याचे दिसून आले. आशियाई बाजारात संमिश्र ट्रेंड असल्याचे संकेत आहेत. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे.
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 150 अंकांनी वधारत 51,972.75 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 38 अंकांची उसळण दिसून आली. निफ्टी 15,451.55 च्या पातळीवर खुला झाला होता. बुधवारी शेअर बाजारात घसरण असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली आहे. आज सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 388 अंकांच्या तेजीसह 52,197.01 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 117.50 अंकांनी वधारला असून 15,533.30 अंकांवर व्यवहार करत आहे.
निफ्टी 50 पैकी 44 स्टॉक्समध्ये तेजी असून 5 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर, एका शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. तर, बँक निफ्टीमध्ये 286.70 अंकांची तेजी दिसून आली आहे. बँक निफ्टी 33,132 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरला वगळता निफ्टी मधील सर्व सेक्टोरिअल इंडेक्स तेजीत दिसत आहेत. ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये 0.33 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. तर, ऑटो शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. मीडिया शेअर दरात 1.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, मेटल सेक्टरमध्ये 1.16 टक्क्यांची तेजी दिसत आहे. खासगी बँकांच्या शेअर दरात एक टक्क्यांची वाढ झाली आहे.
बुधवारी, सेन्सेक्समध्ये 709 अंकांची आणि निफ्टीमध्ये 225 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1.35 टक्क्यांची घसरण होऊन तो 51,822 अंकांवर निफ्टीमध्ये 1.44 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,413 अंकावर स्थिरावला होता. शेअर बाजार बंद होताना 1218 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2025 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. तर, 105 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.