Share Market Opening 25 September: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीसह 'या' शेअर्समध्येही घसरण
Share Market Open Today: आजचा सलग पाचवा दिवस असून सतत शेअर बाजारात पडझड होत असल्याचं दिसून येत आहे.
Share Market Opening on 25 September: देशांतर्गत शेअर बाजारावर (Share Market) आज सलग पाचव्या दिवशी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स (Sensex) आणि एनएसई निफ्टी (Nifty) या दोन्ही प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांनी सोमवारी तोट्यासह व्यवहार सुरू केला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला आहे.
सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी बाजारात किरकोळ घसरणीची नोंद झाली. त्यानंतर व्यवहाराच्या पहिल्या काही मिनिटांतच बाजारातील घसरण वाढतच गेली. काही मिनिटांनंतर, सेन्सेक्स सुमारे 115 अंकांनी घसरला आणि 65,900 अंकांच्या खाली व्यवहार करत होता. तर, निफ्टी 32 अंकांपेक्षा अधिक घसरला होता आणि 19,650 अंकांच्या खाली आला होता. दरम्यान, निफ्टीनं आठवड्याभरापूर्वीच 20 हजार अंकांची पातळी ओलांडली होती.
घसरणीचे संकेत प्री-ओपन सत्रातच मिळालेले
प्री-ओपन सत्रात आज शेअर बाजारात किंचित तेजी होती. प्री-ओपन सत्रात, सेन्सेक्स सुमारे 75 अंकांची वाढ दर्शवत होता, तर निफ्टी 4 अंकांच्या नाममात्र वाढीसह ग्रीन झोनमध्ये होता. तर, गिफ्टी शहरातील निफ्टी फ्युचर्स सकाळी सुमारे 25 अंकांनी घसरले होते. यावरून आजही बाजारात पडझड होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. दरम्यान, दिवसभराच्या व्यवहारात बाजार मर्यादित मर्यादेत राहण्याची अपेक्षा आहे.
गेल्या आठवड्यातील शेअर बाजारातील परिस्थिती काय?
यापूर्वी शुक्रवारी शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 220 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 66,000 अंकांच्या जवळ आला होता. तसेच, निफ्टी सुमारे 70 अंकांनी घसरला आणि 19,675 अंकांच्या खाली बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक प्रत्येकी अडीच टक्क्यांहून अधिक घसरले होते.
अमेरिकन बाजारात घसरण सुरूच
शुक्रवारी अमेरिकन बाजारही तोट्यात बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 0.31 टक्क्यांनी खाली आले. तर Nasdaq कंपोझिट इंडेक्समध्ये 0.09 टक्के आणि S&P 500 इंडेक्समध्ये 0.23 टक्के घसरण दिसून आली. सोमवारच्या व्यवहारात आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. दिवसाच्या व्यवहारात जपानचा निक्केई 0.58 टक्क्यांनी वाढला आहे, तर हाँगकाँगचा हँग सेंग 1.54 टक्क्यांनी घसरला आहे.
बहुतांशी मोठ्या शेअर्समध्ये घसरण
सुरुवातीच्या व्यवहारात बहुतांश मोठे शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 ग्रीन झोनमध्ये आहेत, तर 21 शेअर्स घसरले आहेत. बजाज फायनान्स सुमारे 3 टक्के मजबूत आहे. बजाज फिनसर्व्हमध्येही दीड टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, L&T, Axis Bank, Mahindra & Mahindra सारखे शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्यानं घसरले आहेत.