(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Closing Bell : सकाळच्या घसरणीनंतर बाजार सावरला; सेन्सेक्स 60,347 अंकांवर बंद
Share Market Closing Bell :सकाळी झालेल्या पडझडीतून शेअर बाजार सावरला. बाजार घसरणीसह बंद झाला असला तरी जवळपास 600 अंकांची रिकव्हरी केली.
Share Market Closing Bell : सकाळी झालेल्या जोरदार घसरणीनंतर शेअर बाजार (Share Market) पुन्हा सावरला. सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 60 हजार अंकांवर बंद झाला असून निफ्टीने (Nifty) पुन्हा एकदा 18 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना निर्देशांकात घसरण दिसून आली. मात्र, सकाळच्या तुलनेत शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला.
आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 224.11 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांची घसरणीसह 60,346 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66.30 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 18,003 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजारातील व्यवहारात आयटी, ऑटो, रियल्टीच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसला. तर, बँकिंगसह मेटलच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी बँक निर्देशांकात बाजार बंद होताना 500 अधिक अंकांची तेजी दिसून आली.
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 4.28 टक्क्यांची तेजी दिसली. एनटीपीसीच्या शेअर दरात 2.84 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 2.47 टक्के, एसबीआयच्या शेअर दरात 2..37 टक्के आणि कोटक बँकेच्या शेअर दरात 1.44 टक्क्यांची वाढ झाली.
निफ्टीमध्ये इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेकसह, एचडीएफसी लाइफ आणि एल अॅण्ड टीच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली.
अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. प्री-ओपनिंगमध्ये (Share Market Pre-Opening Session) सेन्सेक्समध्ये (Sensex Fall) एक हजार अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी (Nifty) तब्बल 298 अंकांची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत पुन्हा महागाई वाढल्याने (US Inflation Data) अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. महागाई वाढल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात घसरण झाल्यानंतर बाजार सावरू लागला.
अमेरिकन बाजारात मोठी पडझड
अमेरिकन शेअर बाजारात मागील दोन वर्षातील सर्वात मोठी पडझड दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या या पडझडीचा परिणाम आशियाई आणि भारतीय शेअर बाजारावर दिसून येण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांकात जून 2020 नंतरची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत महागाईने पुन्हा डोके वर काढल्याने बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर 8.3 टक्के इतका नोंदवण्यात आला.