Sensex: सेन्सेक्स सुस्साट; दोन वर्षात बाजार 16 हजार अंकांनी वधारला, असा राहिला प्रवास
Sensex All Time High: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठताना 66 हजार अंकाच्या उच्चांकाला गवसणी घातली.
Sensex All Time High: आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराने उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) शुक्रवारी 502.01 अंकांनी वधारत 66,060.90 अंकांचा टप्पा गाठला. दिवसभरात, सेन्सेक्स 600.9 अंकांनी झेप घेऊन 66,159.79 अंकांवर पोहचला. हा आतापर्यंतचा सर्वकालिक उच्चांक आहे. (Sensex All Time High)
वर्ष 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण दिसून आली. त्या दरम्यान शेअर बाजारात जवळपास 30 टक्क्यांची घसरण दिसून आली होती. त्यानंतरच्या काळात बाजार पुन्हा सावरू लागला. लॉकडाऊनच्या काळात शेअर बाजाराकडे बरेचजण वळले. अनेकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. 21 जानेवारी, 2021 रोजी इंट्रा-डे ट्रेडमध्ये सेन्सेक्सने 50,000 अंकांचा टप्पा गाठला. त्यानंतर सेन्सेक्स निर्देशांकात तेजी कायम आहे. जवळपास दोन वर्षात सेन्सेक्स 16 हजार अंकांनी वधारला.
असा राहिला सेन्सेक्सचा प्रवास:
- 21 जानेवारी, 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये सेन्सेक्सने 50,000 अंकांचा टप्पा गाठला.
- 3 फेब्रुवारी, 2021: पहिल्यांदाच सेन्सेक्स निर्देशांक 50,000 अंकांच्या वर स्थिरावला.
- 5 फेब्रुवारी 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये 51,000 चा टप्पा पार केला.
- 15 फेब्रुवारी 2021: 52,000 अंकांवर व्यवहार केला.
- 22 जून 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये 53,000 अंकांचा टप्पा गाठला.
- 4 ऑगस्ट, 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये प्रथमच 54,000 अंकांचा टप्पा गाठला आणि त्या पातळीवरील अंकांवर बंद झाला.
- 13 ऑगस्ट 2021: पहिल्यांदाच 55, 000 अंकांवर गेला.
- 18 ऑगस्ट 2021: इंट्रा-डेमध्ये प्रथमच 56,000 अंकांचा टप्पा पार केला.
- 31 ऑगस्ट 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये 57,000 चा टप्पा ओलांडला
- 3 सप्टेंबर, 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये 58,000 चा टप्पा गाठला आणि त्या पातळीच्यावर बंद झाला
- 16 सप्टेंबर 2021: इंट्रा-डेमध्ये प्रथमच 59,000 अंकांचा टप्पा गाठला
- 24 सप्टेंबर 2021: इंट्रा-डेमध्ये आणि दिवसभरातील व्यवहार संपत असताना सेन्सेक्स 60,000 अंकापर्यंत पोहोचला
- 14 ऑक्टोबर 2021: इंट्रा-डेमध्ये आणि व्यवहार बंद होत असताना सेन्सेक्सने 61,000 अंकाचा टप्पा ओलांडला
- 19 ऑक्टोबर 2021: इंट्रा-डे ट्रेडमध्ये सेन्सेक्सने 62,000 अंकांचा टप्पा पार केला
- 30 नोव्हेंबर 2022: पहिल्यांदा 63,000 चा टप्पा गाठला.
- 28 जून 2023: इंट्रा-डे ट्रेडमध्ये विक्रमी 64,000 चा टप्पा गाठला.
- 3 जुलै 2023: सेन्सेक्सने 65,000 अंकांचा टप्पा ओलांडला.
- 13 जुलै 2023 : इंट्रा-डे ट्रेडमध्ये प्रथमच 66,000 अंकांचा टप्पा गाठला
- 14 जुलै 2023: सेन्सेक्सने पहिल्यांदाच 66,000 अंकांचा टप्पा ओलांडला.
निफ्टीनेही गाठला उच्चांक
राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निर्देशांक निफ्टीदेखील (Nifty) 151 अंकांच्या म्हणजेच 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 19,564 अंकांच्यावर बंद झाला. गुरुवारी तो 19,413.75 अंकांवर होता. आजच्या व्यवहारात, निफ्टीने 19,595.35 अंकांचा उच्चांक गाठला. (Nifty All Time High)