Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धाने मद्यप्रेमींची 'झिंग' उतरणार? बीअरचे दर वाढण्याची भीती
Russia Ukraine Crisis : रशिया युक्रेन युद्धाच्या परिणाम बीअरच्या किंमतीवरही होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बीअर किंमतीमुळे बीअर प्रेमींचा खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे.
Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जगाच्या राजकारणाला नव्हे तर अर्थकारणालाही बसणार आहे. या युद्धामुळे अनेक उद्योगांसमोरील आव्हानांत भर पडली आहे. अशातच आता ऐन मोसमात बीअर कंपन्यांसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. बीअर उत्पादनात महत्त्वाचा घटक असणाऱ्या बार्लीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये युक्रेनचा समावेश होतो. मात्र, युद्धाचा परिणाम जागतिक पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीअरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षात बीअर विक्रीवर परिणाम झाला होता. त्यामुळे कंपन्यांना आर्थिक फटका बसला होता. या वर्षी कोरोनाची लाट ओसरल्याने बीअरचा खप वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यावर आता पाणी फेरण्याची चिन्हं आहेत. देशभरात 31 हून अधिक कॅफे आणि बार चालवणारी कंपनी Beer Cafeचे सह-संस्थापक राहुल सिंह यांनी म्हटले की, दोन वर्षात कोरोनामुळे बीअरच्या विक्रीवर परिणाम झाला होता. आता युक्रेन युद्धामुळे बीअर व्यवसायासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बीअरच्या दरात वाढ होणार?
बीअर ब्रॅण्ड Bira 91 चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुर जैन यांनी सांगितले की, युक्रेन संकटामुळे बीअर व्यवसायावर परिणाम होणार आहे. बार्लीच्या किंमतीत युद्धामुळे वाढ झाली आहे. युक्रेन युद्धामुळे काही काळासाठी किमतीत वाढ होऊ शकते. बीअर कंपन्या तातडीने किमती वाढवणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मद्याच्या किमती काही प्रमाणात सरकार ठरवते. युद्ध अधिक काळ सुरू राहिल्यास बार्लीच्या किंमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे बीअरच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
ऐन मोसमात बीअरची दरवाढ ?
एकूण बीअरच्या खपापैकी 40 ते 50 टक्के खप मार्च ते जुलै महिन्यात होतो. आर्थिक वर्ष 2023 मध्ये बीअरच्या विक्रीत 40 टक्क्यांनी वाढ होईल असा बीअर कंपन्यांचा अंदाज होता. कोरोना महासाथीमुळे असलेले निर्बंधाच्या परिणामी रेस्टोरंट्स, बार आणि क्लब बंद होते. देशात सर्वाधिक बीअर विक्री याच ठिकाणी होते.