Russia : डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा धक्का, रशियाकडून भारताला तेल खरेदीवर दुप्पट सवलतीची ऑफर, अमेरिका काय करणार?
Russia Crude Oil Discount:भारताची अमेरिकेसोबत व्यापारी चर्चा सुरु असतानाच रशियाकडून सुरु असलेली तेलखरेदी भारत वाढवणार आहे. कारण रशियानं भारताला दुप्पट सवलत देण्याची ऑफर दिली आहे.

Russia Crude Oil Discount: भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारी करारासंदर्भात चर्चा सुरु आहेत. अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ परस्परशुल्क म्हणून लादलं आहे. तर, भारत रशियाकडून तेलखरेदी करत असल्यानं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे. यानंतर देखील भारत येत्या काळात रशियाकडून होणाऱ्या तेलाची आयात वाढवण्यास तयार आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी करु नये अशी अमेरिकेची भूमिका आहे. मात्र, भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करुन यूक्रेन विरूद्धच्या युद्धासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देतेय, असा तर्क अमेरिकेनं लावला आहे. त्यामुळं भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, अशी अमेरिकेची भूमिका आहे. अमेरिकेच्या दबावानंतर देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवली आहे. देशाची ऊर्जा गरज भागवण्यासाठी जे आवश्यक निर्णय आहेत ते वाणिज्यिक आणि धोरणात्मकदृष्ट्या योग्य असल्याचं भारतानं म्हटलं आहे.
Russia Offer to India : रशियाची भारताला नवी ऑफर
एकीकडे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहेत. त्याचवेळी येत्या काही महिन्यांमध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी त्यांच्यावर उलटल्याचं पाहायला मिळतंय.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रशिया त्यांच्याकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला दुप्पट सवलत देणार आहे. रशियानं नोव्हेंबरपासून भारतासाठी ब्रेंट क्रुडच्या लोडिंगवर प्रति बॅरल 2 डॉलर ते 2.50 डॉलर पर्यंतची सूट देण्याची ऑफर दिली आहे. भारतानं ही सवलत स्वीकारल्यास अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम जाणवणार नाही. जुलै आणि ऑगस्टमध्ये रशियाकडून दिली जाणारी सवलत 1 डॉलर प्रति बॅरल इतकही होती. रशिया त्यावेळी देशांतर्गत गरजांवर लक्ष केंद्रीत करत होता.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादलं आहे. भारतावर ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ जाहीर केलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा 25 टक्के टॅरिफ रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं लादलं. दरम्यान, अमेरिकेतली काही खासदारांनी भारतावर लादलेलं टॅरिफ मागं घेण्याची मागणी ट्रम्प यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचं नोबेल मिळावं यासाठी दावेदारी केली होती. ट्रम्प यांनी सात युद्ध थांबवल्याचा दावा केला होता. मात्र, शांततेचं नोबेल मारिया माचाडो यांना जाहीर झाला.























